कुर्निसात
सर्व रसिकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, माझी खालील 'कुर्निसात' ही गझल पुढील वर्षी अमेरिकेत होणा-या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनातील सादरीकरणासाठी निवडण्यात आलेली आहे.
गझल मी स्वतः पेश करणार नसून तेथील स्थानिक कलाकार या रचनेचे सादरीकरण करतील.
आपल्या सर्वांच्याच शुभेच्छा या घटनेमागे होत्या, हा मला विश्वास आहे.
लोभ आहेच, तो कायम ठेवावा ही विनंती.
'तुला विचारू', असे कधीचे मनात होते
(कुठे निराळे तुझ्या तरी वागण्यात होते?)
हळूच माझ्याकडे तुझे पाहणे तसे ते
कसे कळावे तुला, कसे काळजात होते !
म्हणायचे जे तुला, मला ते कळून गेले
जरी निराळेच शब्द त्या बोलण्यात होते
तुझ्या विचारात मी गडे एवढा हरवतो
कळे न, केव्हा सकाळ होते नि रात होते
फुले तुला पाहताच लवली, मिटून गेली
तुझ्याच रंगास ते जणू कुर्निसात होते
मला तुझे स्वप्न ज्या क्षणी सापडून गेले...
हजार हसरे, प्रसन्न तारे नभात होते
सुगंध दोन्हीकडे,जराशी छटा निराळी
गुलाब होते इथे, तिथे पारिजात होते
-केदार पाटणकर
प्रतिसाद
जयन्ता५२
सोम, 05/11/2007 - 14:20
Permalink
कुर्निसात
केदार,
मस्त गझल! वागण्यात, बोलण्यात व कुर्निसात हे शेर लाजवाब!
आमचा कुर्निसात स्वीकार करा!
दीपावलीच्या शुभेच्छा !
जयन्ता५२
समीर चव्हाण (not verified)
सोम, 05/11/2007 - 15:04
Permalink
व्वा
दीपावलीची भेट आवडली...
पुलस्ति
सोम, 05/11/2007 - 20:01
Permalink
वा वा!
केदार, गझल मस्तच!
वागण्यात आणि कुर्निसात शेर आवडले! "काळजात" शेराचा लहजा फारच सुंदर आहे!!
दिवाळीच्या माझ्यातर्फेही शुभेच्छा.
-- पुलस्ति.
संतोष कुलकर्णी
मंगळ, 06/11/2007 - 10:49
Permalink
छान
छान गझल आहे. काळजात मधला साधेपणा आणि कुर्निसातमधली सूक्ष्म चित्रमय कल्पना आवडली.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
चक्रपाणि
मंगळ, 06/11/2007 - 22:01
Permalink
छान
तुझ्या विचारात मी गडे एवढा हरवतो
कळे न, केव्हा सकाळ होते नि रात होते
फुले तुला पाहताच लवली, मिटून गेली
तु्झ्याच रंगास ते जणू कुर्निसात होते
व्वा! हे शेर विशेष आवडले. एकंदर गझल छान वाटली. शेवटच्या शेरात रंगास ऐवजी गंधास सुचवावेसे वाटले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
धोंडोपंत
शुक्र, 09/11/2007 - 18:02
Permalink
छान गझल
श्री. केदार पाटणकर यांस,
गझल छान आहे. आवडली.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
चक्रपाणि पंतांनी सुचविलेला बदल योग्य वाटतो.
आपला,
(सहमत) धोंडोपंत
तुमची वृत्तावरील पकड चांगली आहे. वृत्त सुंदर निभावले आहे.
"लगालगागा | लगालगागा | लगालगागा |"
ह्या वज़नात लिहीणे दिसते तेवढे सोपे नाही. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
या गझलेच्या निमित्ताने दिवाळीचा फराळ चांगला झाला.
आपला,
(गोडखाऊ) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
केदार पाटणकर
मंगळ, 27/11/2007 - 20:20
Permalink
धन्यवाद
मनापासून धन्यवाद सर्वांना ...!
प्रदीप कुलकर्णी
शनि, 01/12/2007 - 17:37
Permalink
छान गझल...
छान गझल, केदार. आवडली.
..................
तुझी याआधीची गझल, कशी कुणास ठाऊक, माझ्या नजरेतून सुटली होती. तीही गझल मला आवडली. चहा घेऊ, बसू बोलत...किती सहज शेर...! लिहीत राहा...मनापासून लिहीत राहा...शुभेच्छा.
केदार पाटणकर
सोम, 15/09/2008 - 16:40
Permalink
नवा शेर
जांभळ्या रंगातील शेर नवा आहे.
मानस६
सोम, 15/09/2008 - 17:47
Permalink
म्हणायचे जे
म्हणायचे जे तुला, मला ते कळून गेले
जरी निराळेच शब्द त्या बोलण्यात होते... वा
-मानस६
केदार पाटणकर
मंगळ, 16/09/2008 - 13:27
Permalink
धन्यवाद
धन्यवाद...
अजय अनंत जोशी
मंगळ, 16/09/2008 - 17:09
Permalink
छान.
छान जमलंय.
समीर चव्हाण (not verified)
गुरु, 18/09/2008 - 11:04
Permalink
नवीन शेर आवडला...
मला तुझे स्वप्न ज्या क्षणी सापडून गेले...
हजार हसरे, प्रसन्न तारे नभात होते
केदार पाटणकर
शनि, 27/09/2008 - 14:50
Permalink
धन्यवाद
धन्यवाद, समीर.
केदार पाटणकर
मंगळ, 25/11/2008 - 10:02
Permalink
गझलेची संमेलनासाठी निवड
सर्व रसिकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, माझी 'कुर्निसात' ही गझल पुढील वर्षी अमेरिकेत होणा-या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनातील सादरीकरणासाठी निवडण्यात आलेली आहे.
गझल मी स्वतः पेश करणार नसून तेथील स्थानिक कलाकार या रचनेचे सादरीकरण करतील.
आपल्या सर्वांच्याच शुभेच्छा या घटनेमागे होत्या, हा मला विश्वास आहे.
लोभ आहेच, तो कायम ठेवावा ही विनंती.
ज्ञानेश.
मंगळ, 25/11/2008 - 10:42
Permalink
अभिनंदन!
मला तुझे स्वप्न ज्या क्षणी सापडून गेले...
हजार हसरे, प्रसन्न तारे नभात होते.. वाह! क्या बात है!
केदार, तुमच्या गझलेने ही सातासमुद्रापार झेप घेतलेली पाहून आनंद वाटला.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
गंभीर समीक्षक
मंगळ, 25/11/2008 - 22:47
Permalink
शुभेच्छा!
कवी केदार पाटणकर यांस,
मनापासून हार्दिक शुभेच्छा! आपल्यामार्फत गझल व गझलेमार्फत आपण असेच सातासमुद्रापलीकडेपर्यंत सुप्रसिद्ध व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना! आपली ही गझल निश्चीतच निवडली जाण्यासारखी आहे अन आपले सादरीकरण अत्यंत चांगले होवो अशा आमच्या शुभेच्छा! या गझलेबाबत काही मुद्दे लिहीत आहे. विचारात घ्यावेत अशी मैत्रीपूर्ण विनंती!
'तुला विचारू', असे कधीचे मनात होते
(कुठे निराळे तुझ्या तरी वागण्यात होते?)
एकदम छान!
हळूच माझ्याकडे तुझे पाहणे तसे ते
कसे कळावे तुला, कसे काळजात होते !
हा शेर तुलनेने मतल्यापेक्षा जास्त विधानात्मक आहे. तुझे माझ्याकडे ते हळूच पाहणे माझ्या कसे काळजात होते हे तुला कसे कळणार? अशा स्वरुपाचे विधान! इथे प्रेयसीने चोरून बघितलेले प्रियकराला कळले आहे हे प्रेयसीला माहीत नसणे असे अभिप्रेत असल्यास 'हळुच' या शब्दातुन ते पुरेसे प्रकट होत नाही. हळुचमधे नजरानजर असू शकते, जरी हळुच किंवा चोरटी असली तरी. आम्हाला असे वाटले की आपल्या शेरामधे जादू तेव्हा येईल जेव्हा प्रेयसी प्रियकराच्या नेहमीच्या जागी चोरून पाहते ( तो दिसतोय का ते ) अन ते प्रियकराला दुसर्याच कुठल्यातरी जागेवरून ते बघणे जमते अन तो सुखावतो व प्रेयसीचे ते बघणे त्याच्या काळजात बसते. ( त्यात सुद्धा, एरवी प्रेम नाही असे म्हणणारी प्रेयसी स्वतः मात्र तो आहे की नाही हे चोरून बघते अशी भावना असल्यास फार उत्तम! ) जिथे प्रेम आहे हे द्विपक्षी मान्य झालेले आहे तिथे एकमेकांकडे हळू बघण्यात फारशी गुदगुली होणार नाही. फक्त एक समाधान, की ही व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे आपली आहे याचे! म्हणजे त्यातही मजा असतेच, पण अव्यक्त किंवा वरवर नाकारलेल्या प्रेमात अशी गोष्ट बघायला मिळणे हे फार पुढचे आहे. 'नकार देणे,तरी मला चोरुनी पहाणे......अशी अदा एकदा हजारो युगात होते' असा शेर आम्ही रचला असता. आपल्या या शेरातील एकदा आलेला 'तसे' व दोनदा आलेले 'कसे' हेही आम्ही टाळले असते. अर्थात, आम्ही काय केले असते हा प्रश्नच नाहीये. ( आम्ही आमच्या शेरात 'युगात' हा काफिया घेतला आहे कारण आपल्या या गझलेमधील काफिया तसे बरेच सैलसर आहेत. )
म्हणायचे जे तुला, मला ते कळून गेले
जरी निराळेच शब्द त्या बोलण्यात होते
वा! उत्तम! सुंदरच शेर आहे.
तुझ्या विचारात मी गडे एवढा हरवतो
कळे न, केव्हा सकाळ होते नि रात होते
हाही आमच्यामते सरळ विधानात्मक शेर होतो. त्यातही, आशयाच्या दृष्टीकोनातून नावीन्यही आढळत नाही. तुझ्या आठवणींमधे केव्हा रात्र झाली अन केव्हा सकाळ झाली तेच कळत नाही, असे विधान! आपण निवडलेल्या काफियांमधे काय वाट्टेल ते खरे तर बसू शकेल. नाट्यमयता, विरोधाभास, उपमा, धक्कातंत्र, अतिशयोक्ती, विनोद,काहीही! पण याच आशयाशी निष्ठा ठेवून शेर रचायचा झाल्यास 'तुझ्या विचारांमधेच जाती सकाळ राती...तुझ्यात माझी पहाट, संध्या तुझ्यात होते' असा आम्ही रचला असता.
फुले तुला पाहताच लवली, मिटून गेली
तुझ्याच रंगास ते जणू कुर्निसात होते
कवी चक्रपाणी यांनी वर म्हंटलय की 'रंगास' च्या ऐवजी 'गंधास' जास्त योग्य व्हावे. प्रेयसीची किंवा आवडत्या स्त्रीची तुलना फुलांबरोबर करताना तीन गोष्टींमुळे केली जाते.
सुगंध
नाजूकपणा
रंग
मात्र यात रंग हा जो भाग आहे, तो प्रत्येक फुलाचा खूप वेगळा असू शकतो. ( म्हणजे गुलाब व चाफा अशी तुलना....दोन चाफ्यांचा एकमेकांपेक्षा वेगळा असे म्हणायचे नाहीये ). तसेच काही काही फुलांचे रंग असे असतात ( जास्वंदी - ओठासाठी, कमळ - परत ओठांसाठी --- या क्षेत्रातला आमचा व्यासंग थोडा कमी पडतो ) की जे संपूर्ण स्त्रीला उपमा म्हणुन म्हणता येणार नाही. म्हणजे एखादी स्त्री किंवा प्रेयसी ही चाफ्याच्या फुलासारखी दिसते म्हंटले तर ती पिवळी वगैरे आहे की काय अशी शंका येऊ शकेल. त्यामुळे, फुलांच्या उपमा स्त्रीला बहुतांशी वेळा त्यांच्या सुगंधांमुळे ( फुलांच्या ) व नाजूकपणामुळे ( या उक्तीवर आमचा पुर्वी पूर्ण विश्वास होता, की स्त्री नाजूक असतेच ) दिल्या जातात. मुख्य म्हणजे, आपण जेव्हा ही गझल किंवा हा शेर सादर कराल ( अमेरिकेत ) तेव्हा पहिली ओळ ऐकल्यावरच फुले का लवली व का मिटून गेली हे श्रोत्यांना लक्षात येईल. सांगायचा मुद्दा असा की यातही एक थोडीशी विधानात्मकता व सरळपणा आहे, जो माझ्यामते आपण पुनर्विचारात घ्यावात कारण आपण गझलेसाठीच तिकडे जाणार आहात.
मला तुझे स्वप्न ज्या क्षणी सापडून गेले...
हजार हसरे, प्रसन्न तारे नभात होते
हा शेर चांगला आहे, पण हा शेरही सरळ आहे. मात्र तो थोडा वेगळाच असल्यामुळे , म्हणजे स्वप्न सापडल्यावर काय झाले असावे बाबा अशा प्रश्नावर जेव्हा श्रोते विचार करत असतील तेव्हा एकदम हजार हसरे तारे ही कल्पना भाव खाऊन जाईल.
कृपया शांतपणे विचारात घ्या की आम्ही या अवेळी आपल्याला जे लिहीत आहोत ते शुभेच्छांमधून उत्पन्न झालेले विचार आहेत. राग मानू नये.
जय भारत, जय मराठी गझल! १०० पैकी २०० मिळोत!
भूषण कटककर
बुध, 26/11/2008 - 12:06
Permalink
केदार...
केदार,
परत चहा पाहिजे. यावेळी चांगला साग्रसंगीत चहा पाहिजे.
मनापासून लाखो शुभेच्छा!
केदार पाटणकर
बुध, 26/11/2008 - 13:35
Permalink
धन्यवाद...
चमत्कारी, ज्ञानेश, गंभीर समीक्षक व भूषण,
मनापासून धन्यवाद.
मी नमूद करू इच्छितो की, मी तिकडे जाणार नसून तेथील कलाकार ती गझल ऐकवतील वा गातील. माझ्याव्यतिरिक्त मराठी संकेतस्थळावर लिहिणा-या आणखी काही नव्या कवींच्या रचना त्या कार्यक्रमात असतील.
पुन्हा एकदा आभार सर्वांचे.
कौतुक शिरोडकर
बुध, 26/11/2008 - 14:53
Permalink
अभिनंदन
अभिनंदन
जास्त रुचला.
म्हणायचे जे तुला, मला ते कळून गेले
जरी निराळेच शब्द त्या बोलण्यात होते
केदार पाटणकर
शुक्र, 28/11/2008 - 14:20
Permalink
भूमिका व विचार
गंभीर समीक्षक, धन्यवाद.
आपण भरपूर वेळ काढून प्रतिसाद लिहिता, यासाठी मीच काय परंतु इतरही गझलकार आपल्याला धन्यवाद देतील.
मैत्रीपूर्ण प्रतिसाद असेल तर रागाविण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जालस्थले चर्चेसाठीच असतात.
शेरांबाबत माझी भूमिका व विचारः
हळूच माझ्याकडे तुझे पाहणे तसे ते
कसे कळावे तुला, कसे काळजात होते !
अभिप्रेत अर्थः
वर वर त्याच्याबद्दल काही वाटत नाही, असे सांगणा-या तिच्या मनात त्याच्याबद्दल एक जागा तयार झालेली आहे. तिचे हळूच पाहणे त्याच्याही लक्षात आले आहे. दोघांची नजरानजर होते तेव्हा त्याच्या काळजात जे काही होते ते त्यालाही शब्दात व्यक्त करणे कठीण जाते..( मग तिला ते कळणे तर दूरच...)
हळुचमधे नजरानजर असू शकते.
माझ्या शेरात नजरानजर आहे.
जिथे प्रेम आहे हे द्विपक्षी मान्य झालेले आहे तिथे एकमेकांकडे हळू बघण्यात फारशी गुदगुली होणार नाही.
माझ्या शेरात प्रेम द्विपक्षी मान्य होण्याच्या किंचित अलीकडचा टप्पा आहे. त्यामुळे गुदगुल्या सहज शक्य आहेत.
अव्यक्त किंवा वरवर नाकारलेल्या प्रेमात अशी गोष्ट बघायला मिळणे हे फार पुढचे आहे.
नीट समजले नाही. फार पुढचे आहे, असे आपल्याला का वाटते, हे स्पष्ट करावे. मला तर पुढचे नाही तर आधीचेच वाटते . :)
आपल्या या शेरातील एकदा आलेला 'तसे' व दोनदा आलेले 'कसे' हेही आम्ही टाळले असते.
मला शेर तसाच सुचला, ज्यात तसे व कसे आहे. दुसया कसे चा अर्थ काय च्या जवळ जाणारा.
तूर्तास एवढेच.
गंभीर समीक्षक
शुक्र, 05/12/2008 - 14:49
Permalink
चालत असेल तर.....
(गंभीर समीक्षक, धन्यवाद.
आपण भरपूर वेळ काढून प्रतिसाद लिहिता, यासाठी मीच काय परंतु इतरही गझलकार आपल्याला धन्यवाद देतील.)
कवी केदार,
आपल्याला चालत असेल तर मी आपल्या गझलांवर निष्पक्ष प्रतिसाद द्यायला तयार आहे. तसेच ज्यांना चालत असेल त्यांच्या गझलांवर मी निष्पक्ष प्रतिसाद देत जाईन.
निष्पक्ष म्हणजे कवीला काय वाटे हे न बघता समोर आलेल्या गझलेवर प्रतिसाद देणे!
केदार पाटणकर
मंगळ, 27/10/2009 - 13:37
Permalink
नवा शेर... सुगंध
नवा शेर...
सुगंध दोन्हीकडे,जराशी छटा निराळी
गुलाब होते इथे, तिथे पारिजात होते
केदार पाटणकर
शुक्र, 02/04/2010 - 12:48
Permalink
नवा शेर... मला जसे पाहिजे तसा
नवा शेर...
मला जसे पाहिजे तसा व्यक्त होत गेलो
--नकाच सांगू, कसे जगाचे प्रघात होते!
ऋत्विक फाटक
शुक्र, 02/04/2010 - 20:18
Permalink
वा:! नवा शेरही छानच आहे!
वा:! नवा शेरही छानच आहे!
केदार पाटणकर
शनि, 10/04/2010 - 14:13
Permalink
धन्यवाद, ऋतिक.
धन्यवाद,
ऋतिक.
गंगाधर मुटे
बुध, 14/04/2010 - 22:13
Permalink
मस्त गझल, आवडली.
मस्त गझल, आवडली.
संतोष कुलकर्णी
गुरु, 15/04/2010 - 16:15
Permalink
केदार, आभिनंदन. आपल्या गझलेची
केदार,
आभिनंदन.
आपल्या गझलेची विश्व साहित्य संमेलनाची वारी आभिनंदनीय आहे. खूप आनंद वाटला. गझलेबद्दल मी अगोदरच प्रतिसाद दिलेला आहे. नव्या शेरांपैकी 'पारिजात' उत्तम आहे. 'प्रघात' आहे त्यापेक्षा खटकेबाज होऊ शकतो. परिष्करण करणे आक्षेपार्ह नाही. मात्र, एक सावधानता ... आता या गझलेच्या विस्तारमोहापासून शक्यतो दूर रहावे. अर्थातच अपरिहार्यता होईपर्यंत.
निरोप पहा.
पुनश्च अभिनंदन.