विचारीन पांढर्‍या छडीला...

विचारीन पांढर्‍या छडीला...


ती स्वप्नाळु भिरभिरणारी नजर सापडेना
विचारीन पांढर्‍या छडीला अगर सापडेना

प्राक्तनामधे लिहिले नियतीने जे जे ते
खोडुन काढिल असा एकही रबर सापडेना


पुस्तकापरी येता-जाता मला चाळती
घालायाला परी कुणाला कव्हर सापडेना

दाखवायचे कुठुन मुलांनी विचारले तर
गोष्टीमधले आटपाट ते नगर सापडेना


शब्द विखारी असा बोलते गोड वैखरी
जरी छाटली तरी आतले जहर सापडेना

काढायची कशी जळमटे आयुष्याची
कुठे कुठे लागली शोधुनी कसर सापडेना

पुरातत्ववेद्यांनी हा निष्कर्ष काढला
``वर्णभेद उतरंडी विरहित शहर सापडेना''

लिहून झाली पुरी  ग़ज़ल घनश्याम' जरीही
रसिकांना वाटते तरी का बहर सापडेना



घनश्याम धेंडे
८/अ, भीमदीप सोसायटी
गोखले नगर, पुणे ४११०१६.


प्रतिसाद

पुस्तकापरी येता-जाता मला चाळती
घालायाला परी कुणाला कव्हर सापडेना... अप्रतिम.. अर्थांच्या अनेक छटा दिसल्या..
शब्द विखारी असा बोलते गोड वैखरी
जरी छाटली तरी आतले जहर सापडेना... बहोत खूब..!
-मानस६


सार्‍या कल्पना नाविन्यपूर्ण आहेत आणि चांगल्याही आहेत यात वादच नाही.
पण माझा वृत्ताबद्दल गोंधळ उडतो आहे...
हे अक्षरगणवृत्त आहे की मात्रावृत्त?
संपादकांनी खुलासा करण्याची तसदी घेतल्यास आभार.

काही मात्रा वृत्त वगैरे नाही. ही तांत्रिकदृष्ट्या चुकलेली रचना आहे. मान्यवरांच्या गझलांच्या यादीत घेण्याचे कारण काय असावे हे समजत नाही.
हिणकस प्रतिसाद लक्षात आणुन देणार्‍यांनी जरा या विसंगतीकडे पहावे.
कशासाठी असे करायचे? कशासाठी चुकीच्या गझला साईटवरील सर्वश्रेष्ठ गझलांच्या यादीत घ्यायच्या?