तोरा



का परक्या दु:खात रहावे?
आपण आनंदात रहावे!


वय झाले, का वणवण करता?
देवा - देव्हार्‍यात रहावे


किरणांनी हळवे व्हावे अन -
दव थोडे पानात रहावे


भांडण झाले घोर तरीही
येत रहावे, जात रहावे


घोटावी ही लाळ किती रे
का कोणाचे खात रहावे?


कानावरती हात धरोनी
गाणार्‍याने गात रहावे!


नशिबाने हे पदरी पडले
का आम्ही तोर्‍यात रहावे?


श्वासांचा नसतोच भरवसा
जगताना लक्षात रहावे




गझल: 

प्रतिसाद

भांडण झाले घोर तरीही
येत रहावे, जात रहावे
वाव्वा! खालची ओळ अगदी मस्तच आहे. अगदी बोलकी ओळ आहे. किरणांचा शेरही फार आवडला. लक्षात रहावेही. एकंदर गझल, तिच्यातली  सहजता आवडली.

भांडण झाले घोर तरीही
येत रहावे, जात रहावे.. वा .. एक तसलिम लाजमी सी है.. आठवले


श्वासांचा नसतोच भरवसा
जगताना लक्षात रहावे.. वैचारिक दृष्ट्या वजनदार शेर

        -मानस ६

म्हणतो.
पुलस्ति  सुरेख गझल... आवडली.
विश्वास

वा..वा...पुलस्ती,

किरणांनी हळवे व्हावे अन -
दव थोडे पानात रहावे              फारच छान

भांडण झाले घोर तरीही
येत रहावे, जात रहावे              सुंदर



नशिबाने हे पदरी पडले
का आम्ही तोर्‍यात रहावे?         मस्त

श्वासांचा नसतोच भरवसा
जगताना लक्षात रहावे                झकास
शुभेच्छा...!
 

पुलस्ति,
गझल आवडली. छोटी बहर तुम्हांला छान जमते.
वय झाले, का वणवण करता?
देवा - देव्हार्‍यात रहावे

किरणांनी हळवे व्हावे अन -
दव थोडे पानात रहावे

हे २ शेर विशेष आवडले.
- कुमार

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार!

श्वासांचा नसतोच भरवसा
जगताना लक्षात रहावे
अप्रतिम

श्वासांचा नसतोच भरवसा
जगतांना लक्षात रहावे-
मस्त.

किरणांनी हळवे व्हावे अन -
दव थोडे पानात रहावे

मला खंत आहे की मी अगोदर याला दाद दिली नाही...

व्वा! एकूणच छान.
कलोअ चूभूद्याघ्या