भयंकर


शब्दांमधली आग भयंकर...!
मौनमधला राग भयंकर...!


इच्छा झरते तप्त हलाहल,
गात्री फिरतो नाग भयंकर...!


देहापरते मोहक लाघव..
शीलावरचा डाग भयंकर...!


ंमृत्यूही यावाच अचानक,
...तो शेवटचा भाग भयंकर...!


दूरावरुनी दरवळ घ्यावा,
स्पर्शाची ती बाग भयंकर...!


अंधांच्या नशिबास कशी ही..,
स्वप्नाहुनही जाग भयंकर...!


                       -प्रा. डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर


गझल: 

प्रतिसाद

अख्खी गझल फारफार आवडली. जोमदार आहे.
स्वप्नाहुनही जाग भयंकर...!
काय ओळ आहे.

उत्तम गझल!
नाग, शेवटचा भाग आणि जाग - हे शेर तर अप्रतिम आहेत. क्या बात है!!
-- पुलस्ति.

अप्रतिम गझल. सगळेच शेर आवडले. शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
   सॅन होजे, कॅलिफोर्निया

दूरावरुनी दरवळ घ्यावा,
स्पर्शाची ती बाग भयंकर...!
व्वा संतोषसाहब

संतोष,
अंगावर काटा आणणारी गझल... आवडली.
गात्री फिरतो नाग भयंकर...!  - वा!
'भयंकर' ही रदीफ फारच आवडली. सगळेच शेर छान आहेत.
- कुमार

गझल आवडली, काही शेर अस्वस्थ करून गेले.