..पुन्हा सांग ना!

..पुन्हा सांग ना!

कसे भेटले, युग-तॄष्णा नि अधीर पाणी- पुन्हा सांग ना
खूप भावली, हॄदयाला ही प्रेम-कहाणी- पुन्हा सांग ना

कुठून होत्या, सोबत छाया, विरहाच्या ते, दिसले नाही;
परतीच्या वाटेवर होते नयनी पाणी- पुन्हा सांग ना

हवा ही खबर,आणत राहो; ऐकत राहो, मी ही आणिक,
सरेल आता, पानगळीची ऋतु-विराणी- पुन्हा सांग ना

समय-समुद्रा! बोललास तू, ऐकले परि, कळले नाही;
अल्लड होते, ज्वानीच्या दरियातील पाणी- पुन्हा सांग ना

आज म्हणे, येणार घरी ती! काय सांगता, आणि त्यावर,
खिशात माझ्या, आज निघाली, बरीच नाणी?-पुन्हा सांग ना

पुलाखालच्या, वस्तीमधुनी, भोळी स्वप्ने बरळत होती,
"दारिद्र्याची, पुढे म्हणे, नसणार निशाणी-पुन्हा सांग ना"

-मानस६

ह्यातील पहिले चार शेर हे पाकिस्तान मधील प्रसिद्ध शायर अमजद इस्लाम अमजद ह्यांच्या एका गज़लेतील शेरांचा भावानुवाद आहेत.

गझल: 

प्रतिसाद

पहिल्या चार द्विपदीही आवडल्या. पण

आज म्हणे, येणार घरी ती! काय सांगता, आणि त्यावर,
खिशात माझ्या, आज निघाली, बरीच नाणी?-पुन्हा सांग ना
वाव्वा! सुंदर.

पुलाखालच्या, वस्तीमधुनी, भोळी स्वप्ने बरळत होती,
"दारिद्र्याची, पुढे म्हणे, नसणार निशाणी-पुन्हा सांग ना"
वाव्वा!

ह्या द्विपदी मस्तच.

चित्तरंजनशी सहमत.
चांगली गझल.
अनुवाद हे गझलकारांसाठी आव्हानात्मक क्षेत्र ठरू शकते.
- केदार पाटणकर

गझल अनुवादासहित आवडली. आणि स्वतंत्र शेरही मस्त!