एक संवाद-२
: जाणिवेच्या पातळीवर आपले कवितालेखन केव्हा सुरू झाले?
: महाविद्यालयात गेल्यावर. १९५० पासून थोड्या-फार समजुतीने मी कवितालेखन करू लागलो..
: हे सगळे कवितालेखन आपण जपून ठेवले आहे काय?
: १९४६-४७ च्या दरम्यानच्या कविता सुमारे ५०-६० असतील, एका वैतागलेल्या मनःस्थितीत झुंबरलाल राठी यांच्या वाड्यातील विहिरीत टाकून दिल्या आणि १९५० नंतरच्या ५०-६० कवितांची वही महाविद्यालयातील एका कविसंमेलनात 'गहाळ' झाली. १९५३ पासून मात्र कविता सहसा हरवल्या नाहीत.
: गझल लिहायला आपण केव्हापासून सुरुवात केली? गझल लिहिण्यामागे काही विशिष्ट प्रेरणा होती का?
: साधारणतः १९५५-५६ पासून सुरुवात केली. लिहिल्यानंतर कळले की, हा गझल फॉर्म आहे म्हणून. गझल लिहिण्यामागे विशिष्ट प्रेरणा नव्हत्या. कळत-नकळतच हे घडले आहे.
: गझलेच्या जाणिवेच्या पातळीवर गझल लिहायला केव्हापासून सुरुवात केली?
: साधारणतः १९६३-६४ पासून.
: तुमच्या उमेदीच्या काळात तुमच्यावर कोणकोणत्या मराठी कवींचा प्रभाव पडला? त्यांच्यापासून तुम्ही कोणत्या गोष्टी स्वीकारल्यात?
: उमेदीचा काळ कशाला म्हणता?
: कवितालेखन सुरू झाले. कवितेविषयी मनात एक इमान निर्माण झाले. जाणिवेच्या पातळीवर थोडीफार निर्मिती सुरू झाली तेव्हाचा काळ म्हणू या.
: त्या काळात माझ्यावर केशवसुत, तांबे आणि कुसुमाग्रज यांचा प्रभाव होता. कुसुमाग्रज (म्हणजे तेव्हाचे हं) विशाखातले 'गर्जा जयजयकार' लिहिणारे. केशवसुतांपासून जे काही सांगायचे ते बिनधास्त सांगावे हे मी शिकलो. तांब्यांपासून प्रसाद, माधुर्य व गेयता उचलली आणि कुसुमाग्रजांकडून रोमँटिसिझम आणि उत्तुंग कल्पनाविलास घेतला.
: उर्दूतील तुमचे आवडते कवी कोणते? त्यांच्यापासून तुम्ही काही गोष्टी स्वीकारल्या असतील ना?
: गालिब, इकबाल, जिगर मुरादाबादी, फैज अहमद फैज, नासिर काजमी, कतील शिफाई, अहमद फराज हे माझे आवडते कवी. यांच्यापासून मी दोन गोष्टी स्वीकारल्या. एक म्हणजे कमीत कमी शब्दांतून जास्तीत जास्त आशय उत्कटपणे प्रकट करणे. दुसरी म्हणजे एकही अनावश्यक शब्द न वापरणे. शब्दांची इज्जत करणे व ती करीत असताना गझलेचा नखरा सांभाळणे.
: शब्दांची इज्जत करता म्हणजे शब्दांना जोजवता का? तुमच्या आवडत्या कवींपैकी कुसुमाग्रजांनी 'शब्दच झाले मालक आता सर्व जिण्याचे, जनावराने काबिज केला हा दरवेशी' अशी कबुली दिली आहे आणि 'ज्वलनास्तव जर जन्म आपुला, जळावयाला भिऊ नका' असे शब्दांना आवाहनही केले आहे. तुम्ही शब्दांकडे कोणत्या दृष्टीने पाहता?
: मराठीतल्या काही कवींनी ज्या शब्दांना वारेमाप लाडावून ठेवले आहे, त्या शब्दांना वाटते मीही त्यांना स्वीकारीन. पण अशा शब्दांना मी मुळीच स्वीकारीत नाही, म्हणजे पटले तर घेतो नाहीतर नाकारतो. शब्दांसाठी मी नाही, माझ्यासाठी शब्द आहेत.
अडवून जरी शब्दांनी भरपूर खुशामत केली
दारात वर्तमानाच्या मी अर्थ उद्याचा नेला
ज्यांना मी गझल शिकवतो त्यांनाही मी नेहमीच सांगत असतो, शब्द खुशामत करतात, 'मला घेरे मला घेरे' म्हणून याचना करतात. पण तुम्ही सावध असा.
: यशस्वी गझलेची निर्मिती करताना या शब्दांच्या अडवणुकीतून सुटका करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात का?
: प्रयत्नाशिवाय होत नाही, पण यशस्वी गझल मनातच असते. आजूबाजूचे शब्द बाहेर फेकावे लागतात. शिल्पकाराप्रमाणे दगड तासावा लागतो. एखाद्या जंगलातून वाटचाल करताना हव्या असणाऱ्या फुलझाडापर्यंत पोचायचे असते. पण हे जंगलही फुलझाडांचेच असते, त्यांतले नेमके झाड हेरायचे असते.
: साधारणपणे तुम्ही गझल कशी लिहिता? अनुभव कसे गोळा होतात? लिहिण्याची प्रेरणा कशी होते?
: मनाच्या माळावर आयुष्यात पाहिलेले, भेटलेले, भोगलेले किंवा सोसलेले अनेक अनुभव एकसारखे हिंडत असतात. त्यांचे हिंडणे माणूस संपेपर्यंत संपत नसते. कधी नुसते त्यांच्या पावलांचे आवाज ऐकू येतात. कधी ते दिसत नाहीत पण त्यांची कुजबूज चालू असते. आणि कधीकधी चुकून एखादा चेहराही दिसतो. कधीकधी स्पर्शही जाणवतो. परंतु एखादे वेळी एखादा अनुभव आपल्या सोबतीला इतर अनुभवांचे बारकावे घेऊन येतो तेव्हा 'मतला' तयार होतो. कधी कधी पहिल्या शेराची एकच ओळ तयार होते तर कधी कधी पूर्ण पहिला शेर तयार होतो. हा शेर तयार झाला तरीसुद्धा त्याचा एकदम स्वीकार करायचा नसतो. तो चांगला पाहून, नीट झाडूपुसून स्वच्छ करून मग स्वीकारायचा असतो. त्यासाठी आधी अनावश्यक शब्दांचा कचरा काढून फेकायचा असतो. तेव्हाच लखलखीत अनुभव घेऊन येणारा तलवारीसारखा खणखणीत शेर पदरात पडतो.
: गझलांवर परिष्करणे करता का?
: गझल लिहिताना आपण शेर लिहितोच, पण तो कधी 'फायनल' समजायचा नसतो. गझल तांत्रिक रीतीने पूर्ण झाल्यानंतरसुद्धा काम संपले, असे मी समजत नाही. गझल म्हणजे एखादी भुसभुशीत वस्तू नव्हे आणि शेर म्हणजे शब्दांची पसरट रास नव्हे. गझलेचा एकेक शेर परिष्करणाशिवाय नाहीच. यालाच 'इस्लाह' म्हणतात. गझल लिहिणाऱ्याचे आणि शिकविणाऱ्याचे स्वतःच्या आणि इतरांच्या गझलेत परिष्करण करणे हे कर्तव्यच असते.
: कविवर्य तांबे स्वतःशी गुणगुणत काव्यलेखन करीत असत, असे म्हणतात. तुमची अशी काही विशिष्ट पद्धत आहे का?
: होय. मीदेखील गुणगुणतच गझला लिहीत असतो. त्यामुळे मात्रा चुकत नाही. ज्याला चूक न करता लिहायचे असेल त्याने गुणगुणतच लिहायला हवे.
: यमके तुम्हाला आपोआप सुचतात का? तुम्ही यमके लिहून ठेवता का? यमक आधी डोळ्यांसमोर ठेवून मग शेराची बांधणी होते का?
: मतला तयार होण्याआधी तर काही यमकांचा विचार होत नाही. तो नंतर होतो. आता इतक्या वर्षांच्या सवयीने यमके आपोआप सुचतात. पण कधी कधी 'जमीन फारच तंग' असेल तर यमके लिहावी लागतात. आता ऐका--
आसवांचे जरी हसे झाले
हे तुला पाहिजे तसे झाले
आता 'हसे' आणि 'तसे' यापुढची यमके सोपी नसतात. तेव्हा त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. पण अशी वेळ आता येत नाही.