एक संवाद-१
एक कलंदर आणि मनस्वी आयुष्य जगण्याचे सामर्थ्य सुरेश भटांना लाभले आहे. वंचना आणि उपेक्षा, यशस्विता आणि लोकप्रियता इत्यादींची टोके त्यांच्या वैयक्तिक आयुष्याने गाठलेली असली तरी आयुष्याच्या प्रवासात कवितेशी असलेले त्यांचे इमान अभंग राहिले. परिस्थितीच्या संदर्भात त्यांनी कधी कोणती तडजोड केली असेल पण कवितेच्या संदर्भात त्यांनी कोणतीच तडजोड स्वीकारली नाही. तीत कैवल्यपूर्ण मूल्यभावाचा अभाव असेलही पण आत्मनिष्ठेचा अभाव नाही.
एकांतिक आत्मपूजा आणि समाजाभिमुखता या दोन्ही टोकांवर त्यांच्या कवितेचा लंबक झुलत राहिला आहे. भावुक हळव्या ओळींना या कवीने जन्म दिला आणि माणूसप्रीतीने ती ललकारून उठली. मधाळ कोमल शब्दांत आदिम शारीर भाव आणि मनाचे कोमल बंध नाजूकपणे चित्रित करण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या काव्यात आढळते तसेच अनुदार समाजव्यवस्थेच्या विरुद्ध शब्दांचे शस्त्र परजण्याची शक्तीही आढळते. पण अट्टाहासाने स्वीकारलेल्या सामाजिक बांधीलकीतील तत्त्वज्ञानाचा उरबडवा प्रसार आणि प्रचार करण्याची आसक्ती मात्र त्यांनी अगदी सहजगत्या टाळली आहे. त्यांची कविता खऱ्या अर्थाने माणसांची कविता आहे. तिच्यातील प्रासादिकतेने ती जनसामान्यांना अगदी आपलीच वाटते. या काव्यात व्यक्त होणाऱ्या वैयक्तिक विकल्पांना तिच्या सुलभ संवादमयतेने सार्वजनीन स्वरूप दिले आहे.
गझल या काव्यप्रकारावर त्यांचे अतोनात प्रेम आहे. त्यांच्या सध्याच्या जगण्याचे सगळे ताणतणाव गझलेशी निगडित झाले आहेत. वाङ्मयप्रांतातले एक नवे युद्ध जणू युयुत्सूप्रमाणे त्यांनी आपल्या अंगावर ओढवून घेतले आहे. गझल लिहिणे, हजारोंना ती ऐकवणे, सतत शेकडो गझलकारांशी पत्रव्यवहार करणे, त्यांच्या गझला न कंटाळता वाचणे, त्यांत दुरुस्त्या करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना घडवणे अशी कामे ते अव्याहत करीत असतात. भट सर्वार्थाने गझल जगतात. नोकरी त्यांना देशद्रोहासारखी वाटते. दिवसभर त्यांच्या मनात गझलच निनादत असते. ते घराबाहेर असताना त्यांच्या प्राणप्रिय टेप कपाटात बंद असतो आणि सहाशे-सातशे कॅसेट्स कुलूपबंद असतात. एरवी या कॅसेट्सचा पसारा त्यांच्याभोवती असतो. एकतर दुर्मिळ गझला ते ध्वनिमुद्रित करीत असतात किंवा तल्लीन होऊन फरीदा खानम, गुलाम अली, मेहदी हसन, परवेज मेहदी, बेगम अख्तर, आबीदा परवीन, नाहिद अख्तर, नैय्यरा नूर, बेला सबेरा, ताहिरा सय्यद, मलिका पुखराज यांच्या गझला ऐकत असतात. स्वरांच्या जाळ्यात गुरफटत असतात. शब्दांना दाद देत असतात. सूर शब्दांच्या विश्वात एवढ्या धुंदीने जगणारा कवी विरळा. अशा वेळी त्यांना कुणाचा त्रास नको असतो, नव्हे ते कुणाचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. आपण काही बोललोच तर ते , 'वा वा!' म्हणतात. पण लगेच लक्षात येते की दाद आपल्याला नसून गाण्याला आहे.
त्यांना बोलके करणे आणि आपल्याला हव्या त्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून काढून घेणे मला एखाद्या आव्हानासारखे वाटले. म्हणून एक दिवस श्री. वामन तेलंग यांच्याकडे भेट झाली असताना त्यांना मुलाखतीबद्दल विचारले होते तेव्हा एका तंद्रीत ते मला 'हा दे देंगे' असे म्हणाले होते. तेवढा धागा पकडून त्यांना यावेळी मी गाठले. त्यांचा मूडही बरा होता. मी विचारीत गेलो आणि ते सांगत गेले. मी जे प्रश्न विचारले त्यांचीच त्यांनी उत्तरे दिली असे नाही. कारण त्यांचा तो स्वभाव नाही. तसेही त्यांचे वागणे ऐसपैस आहे. तब्येत खूष असली अन् एकदा का जमिनीवर आसनमांडी घातली, की कधी विषयाला धरून आणि बहुधा विषयाला सोडून त्यांच्या गप्पा सुरू होतात. त्यांना धरबंद नसतो. मी बहुधा रात्रीच सिटिंग्ज घेतली. मदतीला त्यांचा उत्साही पी. ए. ताराचंद चव्हाण असायचा. रात्रीचे एक दोन वाजणे हे त्यांना स्वाभाविक वाटत असावे. त्यांच्या लोकविलक्षण गप्पांच्या अखंड धबधब्यासमोर कागदपेनाची मात्रा चालणार नाही हे लवकरच माझ्या लक्षात आले. या विषयांतरबहुल चर्चेसाठी मी टेपरेकॉर्डरचा आश्रय घेतला आणि अनेक रात्री जागताना ध्वनिमुद्रित झालेल्या या गप्पाष्टकांतील गझलेच्या संदर्भातील काही प्रश्नोत्तरे वेचून काढली ती अशी :
: तुम्ही कवितालेखनाला केव्हापासून सुरवात केली?
: वयाच्या बाराव्या वर्षी मी माझ्या वर्गशिक्षकावर आरती रचली. जर तिला 'कविता' म्हणणार असाल तर मी १९४४ सालीच कवी बनलो असे म्हणायला हरकत नाही.