'अन् गजल जुळे'...संक्षिप्त प्रस्तावना

डॉ. आश्विन जावडेकर "अजब" आणि कुमार जावडेकर या जुळ्या बंधूंनी लिहिलेल्या 'अन् गजल जुळे' या गझल संग्रहाचे येत्या २१ जून रोजी प्रकाशन होत आहे. 'अनघा प्रकाशन, ठाणे' यांच्या ४२ पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते २१ जून २००७ रोजी दुपारी ३ वाजता मंत्रालयातील समिती सभागृहात आयोजन करण्यात आलेला आहे. त्यात ह्या पुस्तकाचा समावेश आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री मधुमंगेश कर्णिक (अध्यक्ष - साहित्य संस्कृती मंडळ), अरुण साधू (अध्यक्ष - अखिल भारतीय साहित्य संमेलन), भारतकुमार राऊत (संपादक - महाराष्ट्र टाइम्स) हे उपस्थित राहणार आहेत.

'...पांडित्याची पगडी डोक्यावर मिरवणार्‍यांना कविता कळते असे समजण्याचे कारण नाही...कविता अंत:करणाला उमजते. असे अंतःकरण तुम्हांला आहे ही भाग्याची गोष्ट आहे...' हे मंगेश पाडगाबकरांचे आशीर्वाद लाभलेल्या या जुळ्या बंधूंचा हा पहिलाच गझल-संग्रह! या गझल-संग्रहाची प्रस्तावना लिहिली आहे पं. यशवंत देव यांनी 'काबिल-ए-गौर' असं शीर्षक असलेली ही प्रस्तावना संक्षिप्त स्वरूपात -


'अन् गजल जुळे' हा जावडेकर बंधूंचा पहिला गजलसंग्रह वाचकांच्या हाती पडतो आहे. मीही त्याचा आस्वाद घेतला आहे. देखण्या काव्य-कुसुमांचा हा एक खूबसूरत नजराणाच आहे असे मला वाटते. कुमार जावडेकर आणि डॉ. आश्विन जावडेकर हे दोघे बंधू कलासक्तच खरे! आप-आपल्या नित्याच्या व्यवसायांमुळे जरी त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळत गेले तरी कविता-छंदांच्या नाक्यावर त्यांची मौजूदगी नित्याचीच! कविता, गजल, संगीत इ. विषयांची आवड दोघांनीही जोपासून आपल्या आयुष्याला एक नाजुक ललितरंगही दिला आहे.

वृत्तबद्ध कविता किंवा छंदबद्ध कविता मला स्वतःला अधिक भावते कारण तिच्यातल्या शब्दावतरणाला एक मालाबद्ध बंदिश सहजच बहाल झालेली असते; जी पुढे जाऊन संगीतातल्या एखाद्या तालावर इशारा करू पाहते. खर्‍या प्रतिभावंताला मालाबद्ध शब्दयोजना ओढूनताणून प्रयत्नपूर्वक करावी लागत नाही. तो त्याच्या लेखणीचा उत्स्फूर्त असा एक शब्दाविष्कारच असतो. असा आविष्कार आपण या संग्रहात पाहू शकतो, याबाबतीत या शायरद्वयांनी एक फारच नेटके काम केले आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यांचा कोणताही शेर बांधेसूदपणाच्या बाबतीत ढिसाळ नाही; शिवाय, त्यांच्या प्रत्येक शेरामधून अनेकविध विषय आणि अनुभव चांगल्या प्रकारे अभिव्यक्त झालेले आपल्याला दिसतात. तरीपण संगीताकडे त्यांचा ओढा असल्यामुळेच की काय त्यांच्या रचनांमधून बर्‍याच ठिकाणी संगीत-क्षेत्रातले संदर्भ आपल्याला आढळतात. उदाहरणार्थः-

"मी शब्द पेरले अन् उमलून सूर आले
फुलता अखेर गाणे टाळ्या पडून गेल्या" (पृष्ठ क्र. १०, कुमार)

किंवा

"जीवनाचा नूर आहे वेगळा
ताल, लय अन् सूर आहे वेगळा"(पृष्ठ क्र. १, कुमार)
"मांडतो शब्दांत मी दु:खे जगाची"
भोवती माझ्या सुरांचे वलय आहे" (पृष्ठ क्र. १२, कुमार)
"गातील पक्षी इथली कहाणी
तू थांब येथे स्फुरतील गाणी" (पृष्ठ क्र. ९, कुमार)

इ. अनेक शेर वाचकांना अधून-मधून भेटतात, एखाद्या मैफिलीचा माहोलच आपल्यासमोर उभा करतात आणि असे शेर वाचताना वाचकही मनातल्या मनात 'बहोत बढिया' अशी दाद देत राहतात!

"जीवन जगणे गंमत आहे
मैफलीतली रंगत आहे" (पृष्ठ क्र. ३४, अजब)

असे लिहिणारे डॉ. 'अजब' जावडेकर असेही म्हणतात...

"जीवना तुझा 'अजब' पसारा
मीच स्वतःला शोधत आहे"(पृष्ठ क्र. ३४, अजब)

त्यांची "रोज साठवत बसतो पैसा" (पृष्ठ क्र. ५७) या शीर्षकाची नजमही वास्तवाशी मेळ खाणारी आहे. या दोन्ही शायरांची शेर लिहिण्याची पद्धत मात्र एकच वाटते. म्हणजे असं की दोघांनाही कमीत कमी शब्दांची ओळ आणि तशा दोन ओळी लिहिणे अधिक भावते; ज्याला प्रचारात 'छोटी बहर' अशी संज्ञा आहे. पाहा ना...

"वेगळे झालो तरी
राहतो एका घरी" (पृष्ठ क्र. ३८, अजब)

किंवा

"जे हवे ते माग आता
आणि चालू लाग आता" (पृष्ठ क्र. ५२, अजब)

किती सहज स्फुरलेले हे शेर आहेत! आणि शब्द किती मोजके!

"वेळ चुकली मैफलीची
काय गाऊ राग आता?" (पृष्ठ क्र. ५२, अजब)

इथे पुन्हा समयोचित रागच सादर करावा ही सांगीतिक प्रणाली विशेषत्वाने उद्धृत झाली आहे.

"तुझ्याकडे पाहूनच पटले
सौंदर्याचा भ्रम चंद्राचा!" (पृष्ठ क्र. ५४, अजब)


प्रत्येकाला प्रियेचा मुखचंद्रच अधिक सुंदर वाटत असतो. ही आंधळ्या प्रेमाची भावोक्ती इथे जेरबंद किंवा शेरबंद झाली आहे! जावडेकर बंधूंनी मराठी शायरीच्या प्रांतात टाकलेले हे पाऊल चांगलेच दमदार वाटते. केवळ 'शब्दांची नीटस जुळणी' असा सरधोपट शेरा मी या शायरीला कधीच देणार नाही. बघा ना - आणखी काही शेर-

"दोघे मिठीत घेऊ हलकेच या सुरांना
घेतो कुशीत अपुल्या लाटा जसा किनारा"

- हा शेर - किंवा

"प्रत्येक जीवनाचा आहे मजा निराळा
भिजला कधीच नाही तो सूर्यही बिचारा"(पृष्ठ क्र. १९, कुमार)

किंवा

"तुझ्या फुलांचा इथे कसा हा गंध दाटतो
येउन इतका दूर कसा मज इथे दाटतो"
आयुष्याची माती केली - लोक म्हणाले
शांतपणे मी पुन्हा नव्याने कविता रचतो" (पृष्ठ क्र. ४४, अजब)

- असे शेर!
म्हणून मला शेवटी म्हणावेसे वाटते की जावडेकर बंधू दोघांच्याही

"लेखी - केवळ भाषा नसते
ते हृदयाचे स्पंदन असते!"

असो, तुमची शायरी उत्तरोत्तर अधिकाधिक समृद्ध होत जावो ही माझी शुभेच्छा मी या ठिकाणी नमूद करतो.
बस, आप लिखते रहिये, हम पढते जायेंगे!

- पं. यशवंत देव

प्रतिसाद

 'अन् गजल जुळे' हा मराठीतला पहिलाच 'जुळा' काव्यसंग्रह आहे, असे वाटते. गझलकार बंधुद्वयांना तसेच 'अन् गजल जुळे' च्या प्रकाशन सोहळ्याला हार्दिक शुभेच्छा. हा गझलसंग्रह भरपूर खपावा, अधिकाधिक रसिकांनी त्यातील सहजसुंदर गझल वाचावी, ह्यासाठीही शुभेच्छा. प्रस्तावना अगदी साजेशी झाली आहे.

चित्तरंजन

कुमार आणि अजब जावडेकर बंधूंच्या 'अन् गजल जुळे'  या गझल/काव्य संग्रहाचे प्रकाशन होत आहे हे वाचून फार आनंद झाला. संग्रहाच्या यशाची खात्री आहेच.
प्रस्तावना उत्तम आहे.
दोघांच्याही वाटचालीस शुभेच्छा!

कुमारपंत / अजबराव,..

'अन् गजल जुळे'  हा आपला  गझल/काव्य संग्रहाचे प्रकाशन होत आहे हे वाचून फार आनंद झाला.  यशाची खात्री आहेच. 
पुढील लेखनास शुभेछा..!
विश्वास

कुमारसाहेब आणि अजबराव, हार्दिक अभिनंदन!
तुमच्या अनेक गझला आम्हाला अशाच वाचायला मिळत राहोत. अनेकानेक शुभेच्छा!
-- पुलस्ति.

अजबराव आणि कुमारपंत,
अत्यंत आनंदाची बातमी कळली. अतिशय समाधान वाटले. आपल्या काव्याच्या वाटचालीला आम्ही मनोगतापासून साक्षी आहोत.
तुमच्या ग़ज़लेचा हा वेलू गगनावरी गेला हे पाहिल्यावर आनंद पोटात माझ्या माईना असे आमचे झाले.
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
 
 
 
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com