दे


दान देताना सदा ते झाकून दे
झाक डोळे पाहणे ही सोडून दे

विसर जे होऊन गेले पूर्वी कधी
ती मने तू, मोडलेली जुळवून दे

हट्ट रीतींचा फुका का व्हावा असा
जे सुखाच्या आड येते, सोडून दे

आठवांची आज का ही छळती भुते
त्या भुतांना भूतकाळी गाडून दे

पांघरायाही इथे ज्यां काही नसे
ते निळे आकाश त्यांना ओढून दे

आजवर टोचून गेले, ते कावळे
कावळा नाहीस तू, ते सोडून दे

का लिहावे तू ललाटी माझ्या असे
राहिले भोगायचे ते खोडून दे

वाहती जखमा मनांच्या त्या भळभळा
बांधण्या चिंधी तयांना, फाडून दे

देत असता मज विसरला दाता कसा
राहिलेले तेच पडद्या आडून दे

देत जा, काही कुणा तू मागू नको
काय द्यावे ते उरी पण जाणून दे

आजही कच्चेच हे मडके राहिले
परत मातीचा घडा तो घडवून दे

सुधीर 


गझल: 

प्रतिसाद

दान देताना सदा ते झाकून दे
झाक डोळे पाहणे ही सोडून दे
ठळकावलेल्या जागी लय मार खाते आहे, असे वाटते.
दान देताना सदा झाकून दे
झाक डोळे पाहणे सोडून दे
हे कसे वाचताना चांगले वाटते आहे.
बाकी गझल छान. काही ठिकाणी दोन ओळींत संबंध थोडा कमकुवत आणि दे हे अन्त्ययमक फिट बसत नाही असे वाटते. उदाहरणार्थ,
आठवांची आज का ही छळती भुते
त्या भुतांना भूतकाळी गाडून दे
ह्या ओळींत दे ऐवजी टाक योग्य वाटले असते.