सुरेश-४

सुरेशच्या कविता खूप गाजल्या. अमरावतीत व अमरावतीच्या बाहेरही. औरंगाबादच्या साहित्य संमेलनाच्या वेळी संयुक्त महाराष्ट्राचा समारोप शाहीर अमर शेखांनी सुरेशच्या माय मराठीवरच्या कवितेने केला. 'गीत तुझे मी आई गाइन' ही सुरेशची कविता अमर शेखच्या तोंडून भैरवीच्या सुरात ऐकल्यावर सर्व संमेलन काही काळ निःशब्द भारावलेल्या अवस्थेत गेले होते.

सुरेशच्या कवितांच्या लोकप्रियतेने विदर्भाची हद्द ओलांडली. त्याच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. काही गीते चित्रपटातून लोकप्रिय झाली. मोठमोठ्या संमेलनातून त्याच्या कवितांची मागणी वाढली. ठिकठिकाणी चाहत्यांची वर्दळ वाढली. त्याच्या ओळी रसिकांच्या व अरसिकांच्याही गळ्यातील ताईत बनल्या. वाढत्या लोकप्रियतेबरोबर स्वाभाविकच तो समकालीनांच्या द्वेषाचाही विषय झाला. तरी सुरेश आपल्या मस्तीतच होता. शब्दांनी, लयीने व सुरांनी त्याचे जीवन व्यापून टाकले होते. त्याची काव्याची नशा वाढली. ही नशा इतकी अस्सली व हुकुमी होती की इतर कुठल्याही उसन्या नशेची त्याला आवश्यकता त्याला पडू नये.

लोकप्रियता व कीर्ती वाढली. लताबाईंनी त्याचे शब्द घराघरात पोहोचवले व मनामनात गोंदवून ठेवले. सातासमुद्रापलीकडे लंडनच्या अल्बर्ट हॉलपर्यंत नेलेल. उर्दूतील उत्कट उल्फत,  इराणी इश्काचा उन्माद, चंद्रभागेच्या वाळवंटातील भक्ती, विषमतेचे व्यासपीठावरील वाभाडे हे विविध रंग त्याच्या गीतातून व गझलातून प्रकट होऊ लागले. अनुभवातील सुभाषितप्राय निष्कर्ष, अभिव्यक्तीतील अकल्पित चमकदार कलाटणी व फारसी कवितेतील बेदरकार, कलंदर वृत्ती या आकर्षक अंगविक्षेपांमुळे त्याच्या गझलांतील शेर एखाद्या तीरासारखे ऐकणाऱ्यांच्या काळजात रुतून बसत. सुरेशने गझल सर्वाधिक लोकप्रिय केली. नवोदितांमध्ये त्याचे अनुकरणही मोठ्या प्रमाणात वाढले. सुरेशचे चाहते व भक्त ठिकठिकाणी उत्पन्न झाले. तिकिट लावून त्याचे काव्यगायनाचे कार्यक्रम होऊ लागले. सभागृहापासून तो उघड्या चौकापर्यंत व मर्मज्ञ जाणकारांपासून तो अल्पशिक्षित जनतेपर्यंत त्याचे कार्यक्रम गाजू लागले. प्राज्ञापासून अज्ञापर्यंत सर्वांना त्याच्या कवितेने वेड लावले. काव्यगायनाचे कार्यक्रम जागोजागी तिकिट लावून होऊ लागले. शंभर रुपयाचे पहिले तिकिट असलेल्या कार्यक्रमांमधून खर्च वजा जाता पाच-पाच हजारांचे उत्पन्न त्याला होऊ लागले. लोकप्रियतेचा अश्वमेधीय यज्ञ ठिकठिकाणी अजिंक्य पत्रे घेत आगेकूच करू लागले. हे दृश्य मित्रांना चकित व प्रसन्न करणारे होते. पण या सर्व यशाने व कीर्तीने सुरेशचे डोके फिरले नाही, हा अनुभव त्याहूनही सुखद व अभिमानवर्धक होता. लौकिकाची इयत्ता एवढी वाढूनही सुरेश बिघडला नाही, बिथरला नाही, बदललाही नाही. वागणे-बोलणे पूर्वीसारखे होते. लोकभाषेत चढ्या आवाजात खुल्लमखुल्ला बोलणे, अधूनमधून वऱ्हाडी हेल काढीत ग्राम्य शब्द पेरणे, अर्वाच्य शिव्या उच्चारण्याबाबत सोवळे न पाळणे, या लकबी त्याने अद्याप सोडल्या नाहीत. अद्यापही परीटघडीचे वर्तन त्याला जमले नाही. फॅशनेबल शैली साधली नाही. कार्यक्रमाच्या वेळी खांद्यावर व गळ्याभोवती रेशमी कलाकुसर केलेला इथपर्यंतच त्याच्या प्रगतीची मजल गेली आहे. फुकटची दिखाऊ ऐट मिरवणाऱ्यांचा उपहास करण्याची खुमखुमी पूर्वीइतकीच कायम आहे. निसर्गाच्या रोषामुळे किंवा स्वतःच्या स्वभावामुळे घरात व बाहेर सहन कराव्या लागलेल्या उपेक्षा व उपमर्दाचा प्रतिशोध घेण्याची बालसदृश वृत्ती अद्याप विझलेली नाही. राग आणि लोभ या दोन ध्रुवांवर हेलकावे खाणारे मन अद्याप तसेच आहे. ते एकदम केव्हा भडकेल व पुन्हा केव्हा शांत होईल याबद्दलचे अनुभवी आडाखे खरे ठरतीलच याचा भरवसा नाही. वागणे कसेही असले तरी त्यामागील मन बाकी पूर्वीसारखेच बालसुलभ निर्मळ आहे. त्याच्या प्रकट वागण्या-बोलण्यात, जाहीर वक्तव्यात वा क्वचित गद्यलेखना, सामाजिक प्रतिक्रियेचा विखार, पचविता न आलेल्या विकारांची वादळे स्फोट पावताना दिसतात. पण कवितेत बाकी मानवतेकरिता व्याकुळ होणारे सौंदर्याश्लेषी मनच तेवढे प्रकट झाले आहे.