सुरेश-३


सुरेशच्या घरातील वातावरणही गमतीदार होते. त्याची आई त्या काळची कर्वे विद्यापीठाची 'गृहितागमा' होती. अमरावतीतील एक सार्वजनिक कार्यकर्ता होती. विशेषतः डाव्या कार्यकर्त्यांना तिचा हक्काच आश्रय होता. सुरेश वडील नामांकित डॉक्टर होते. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांच्या संप्रदायातील बाबाजी महाराज पंडितांचे ते अनुग्रहित होते. ते अतिशय देवभोळे होते, तर शांताबाई भट ह्या कट्टर नास्तिक होत्या. या द्वंद्वाचे अपत्य असल्यामुळे सुरेशच्या व्यक्तित्वात या दोघांच्याही वैशिष्ट्यांचे मिश्रण झाले होते. तो आईसारखा निरीश्वरवादी व आरक्त विचारसरणीचा, तर वडलांसारखा पेहरावाबाबत बेदरकार निघाला. केशवराव भोळ्यांच्या आत्मचरित्रात मी डॉक्टर भटांचा उल्लेख वाचला, तेव्हा सुरेशच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य मला उलगडले. डॉक्टर भट हे केशवराव भोळ्यांचे वर्गबंधू होते. त्यांच्या कपड्यांवर स्वच्छतेचे व खोलीवर साफसफाईचे संस्कार आढळत नसत. खोलीत आल्या आल्या पायानेच अंथरुणाचा गुंडाळा उलगडायचा व त्यावर अंग टाकायचे ही त्यांची सवय होती. मळक्या चादरींचे वा उशींच्या अभ्र्याचे त्यांना वैषम्य नसायचे. सुरेशने त्यांचा तो वारसा पितृभक्तीने सांभाळला.

शिक्षणामुळे व नोकरीमुळे आमच्या अमरावतीकर कंपूची पांगापांग झाली. त्यामुळे सुरेशची व माझी फाटाफूट होणे अटळच होते. पण नागपूरहून वाशीम, यवतमाळ, वा नांदेडहून अचलपूरला जाताना वाटेत अमरावतीला माझा मुक्काम असायचाच. त्यावेळी माझा पडाव कुलधर्मानुसार नगर वाचनालयात असायचा. त्यामुळे मी येणार असल्याचे कळल्यापासूनच वाचनालयाच्या आवारातील बालेकरांकडे सुरेश  व मधुकर केचे हे दोन्ही मित्र ठिय्या मारून असायचे. मी पोहोचल्याबरोबर त्यांची माझ्यावर झडप पडायची. अमरावती सोडेपर्यंत त्या दोघांनाही वेगळे आयुष्य नसायचे. त्यांच्या घरादारालाही या वास्तवाची कल्पना होती. त्यामुळे अमरावतीत माझा मुक्काम असेपर्यंत सुरेशची काळजी करण्याचे व वाट पाहण्याचे त्याच्या घरच्यांनी सोडलेले असायचे.

त्यावेळी सुरेशचे कवितालेखन वाढले होते. पण अद्याप भराला यावयाचे होते. तरी पण प्रत्येक भेटीत परस्परांच्या नव्या कवितांचे वाचन व्हायचे. त्यावर टीका-टिपणी व्हायची. त्या तिघांमध्येही 'सत्यकथे'त प्रकाशित झालेला मी पहिला कवी होतो. त्यामुळे आपोआपच वडिलकीचा मान माझ्याकडे येत असे. सुरेश त्यावेळी कविता वाचत असे, गात नसे. 'छेड छेड तेच गीत, मालकंस आळवीत', ही कविता तेवढी मालकंसाच्या स्वरात त्याने गायिलेली मला आठवते. बाकीच्या कविता तो ठासून म्हणत असे. त्यात काही मधुर भावगीते होती. काही प्रासंगिक कविता होत्या व काही अप्रासंगिकही.

त्यावेळी त्याची एक कविता मला आठवते--

पुन्हा पातलो आज दारी तुझ्या
जुनी बाळगोनी उराशी व्यथा
पुन्हा ओळखीचा दिसे उंबरा
स्मरे अंगणातील भोळी कथा

एके दिवशी सुरेशच्या सर्व कविता मी मागवून घेतल्या आणि वहीत उतरवून ठेवल्या व ती वही त्याला दिली. त्याचा कवितांचा पहिला संग्रह माझ्या हस्ताक्षरात असावा, याची आज मला गंमत वाटते.

पुढे कवी संमेलनामध्ये आमची वारंवार भेट झाली. त्याकाळी अमरावतीत अशी संमेलने खूप व्हायची. मधुकर केचे, सुरेश हे कवी त्यात आघाडीवर असायचे. सुरेश नेहमीच बाजी मारायचा. त्यामध्ये त्याच्या कवितेचा गुण होताच. पण मित्रमंडळीतील त्याची लोकप्रियता हाही महत्त्वाचा भाग होता. असे सर्व मित्र त्या कार्यक्रमांना हजर असत. त्यांनी सुरेशच्या या कविता अनेकदा ऐकलेल्या असत. त्यातील अनेक जागा त्यांना आवडलेल्या असत. त्यामुळे अशा कविता म्हणण्याचा त्याला आग्रह होई वआवडलेल्या जागांवर एकमुखाने दाद मिळे. कवितेतील काही उल्लेखांना स्थानिक संदर्भ असत. ते मित्रमंडळींत नेहमीच चर्चिले जात. त्यामुळे संमेलनामध्ये अशा जागांवर हमखास टाळी पडे.