विजा घेऊन- २

माणुसकीचे व्यापक अभियान
'आम्ही'चे कार्यक्षेत्र मर्यादित नाही . कुठेही माणुसकीच्या सेवेचे पवित्र काम करता येते. त्यांच्या दृष्टीने  ते तीर्थक्षेत्रच होते.
कुण्याही चंद्रभागेचा
किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा
जिथे हा रोवतो आम्ही
या ओळींतून कवीने पंढरीच्या विठोबाची आठवण करून दिली आहे. वास्तवातील विठोबा चंद्रभागातीरी, पंढरपुरी वास्तव्य करतो; पण 'आम्ही'चे नायक म्हणतात-- 'की जिथे आम्ही आमच्या कार्याचा झेंडा रोवतो, तिथेच विठोबा येतो-नाचतो. विठूचे वास्तव्य आणि चंद्रभागेचा किनारा असा आमचा संन्निध आहे. धार्मिक क्षेत्रात भक्तीच्या जिव्हाळ्याला जेवढे स्थान आहे तेवढेच समाजसेवक, देशभक्त यांच्या अपार निष्ठेला समाजजीवनात आहे, असेच कवीला सुचवायचे असावे. कवी पुढे म्हणतो--
दिले प्रत्येक वस्तीला
अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका
उषेच्या वाटतो आम्ही
इथे भेदभाव नाही. माणसे कोणतीही असोत. कुठलीही असोत. त्यांचे जीवन आम्ही सुखमय, सुंदर करतो. त्यांचे कोंदटलेपण नाहीसे करतो. विशाल आभाळ देतो, तेही सोनेरी- असा 'आम्ही'चा सार्थ दावा आहे. 'सोनेरी आकाशा'ची औचित्यपूर्ण प्रतिमा वापरून, कवीने संबंधित आशय अधिक परिणामकारक केलेला आहे. प्रत्येक वस्त, मानवी अस्तित्वाचे प्रत्येक ठिकाण आनंदनिधान व्हावे, ही असोशी या प्रयत्नांमागे आहे. ज्ञानेश्वरांच्या 'पसायदाना'तही असेच व्यापक आवाहन आहे. 'सर्व सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः|'  अशी ही औपनिषदिक प्रार्थना आहे. तिच्याशी हे 'आम्ही ' आपल्या कार्याद्वारे एकरूप झालेले आहेत. याही पुढे जाऊन 'आम्ही' उज्ज्वल, आशादायक भविष्याच्या  उषःसूक्ताची लकेर छेडतात. ती मधुर आहे. 'हाका उषेच्या वाटतो आम्ही'!  'उषेच्या हाका' या अभिनव प्रतिमेने केवढे सौंदर्य त्यांच्या भूमिकेला बहाल केले आहे! रात्र संपली आणि आता ही सकाळी साद आम्ही घालतो  आहोत. येणाऱ्या प्रकाशाची ग्वाही देत आहोत. सर्वत्र लख्ख उजाडणार आहे., याचा विश्वास देत आहोत. अशी आश्वासक सूचना 'उषेच्या हाका'तून मिळते आणि या हाका वाटणारे हात मूर्तिमंत आत्मविश्वास असलेल्या 'आम्ही'चे आहेत!


नाते नव्या पिढीशी
'आम्ही'च्या माणुसकीला व्यापक अभियानाची कदर सध्याच्या चालू पिढीला नाही,  याची कुरतडणारी खंत आणि नव्या पिढीबद्दलचा आशावाद व्यक्त करणारे असे कवितेचे शेवटचे कडवे आहे.
जरी या वर्तमानाला
कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या
पिढ्यांशी बोलतो आम्ही
तसा 'भूतकाळ' गतप्राण झालेला आणि 'वर्तमान' जाणूनबुजून आंधळा आणि बहिरा झालेला आहे. ज्या जिद्दीने आणि त्यागमय वृत्तीने आम्ही 'चागल्या'साठी संघर्ष केला, तिकडे आजच्या पिढीने दुर्लक्ष केले आहे, याची खंत नाही  म्हटले तरी वाटत राहतेच. वर्तमान पिढीची ही बधिरता, संवेदनशून्यता अस्वस्थ करणारी. तरीही ज्याबद्दल निश्चित आशा वाटावी, अशी एक गोष्ट आहे.  ती म्हणजे उगवती पिढी, नवी तरुण पिढी. उत्साहाने सळसळणारी. तेजस्वी! कवीच्या शब्दांत 'विजा घेऊन येणारी' तिच्याशी संवाद साधायचा. मनातले बोलायचे. कारण आपला त्यागाचा वारसा तीच समर्थपणे सांभाळील, याची खात्री 'आम्ही'ना वाटते.
सुरेश भटांच्या निवडक उत्तमोत्तम गझलांपैकी 'आम्ही' ही एक आहे. तिच्यातील आशय मनावर आदळताना ठिणग्या उडतात. गझल असल्यामुळे तिची बांधणी कमालीची रेखीव; पण बांधणी वाटू नये एवढा सहज-स्वाभाविक आविष्कार. विरोधन्यासाचा परिणामकारक वापर. या सर्व विशेषांमुळे रसिकांच्या मनाचा ती सहज कब्जा घेते.
--- पुरुषोत्तम पाटील
(दै. केसरी, अमृताची अक्षरे ह्या सदरातून साभार)