जितके जमते..

=======================

संवादाचा ढळतो आहे तोल, तरीही-
जितके जमते, तू माझ्याशी बोल तरीही

तुझ्या कृपेची वर्षा झाली.. निरभ्र झाले
अजून शिल्लक भिंतीमधली ओल तरीही

काठावरती बसणे बहुधा रम्य असावे
आपण जावे जमते तितके खोल तरीही

भेटत नाही मित्र अचानक रस्त्यावरती
म्हणावयाला पृथ्वी असते गोल, तरीही !

आपण आता येथे असणे सुंदर आहे
बदलू शकतो हा सगळा माहोल, तरीही !

पानांमध्ये पिंपळजाळी जपत रहावी,
असल्या संदर्भांना नसते मोल, तरीही...

-ज्ञानेश.
========================

गझल: 

प्रतिसाद

ज्ञानेश,

नाही आवडली गझल.
मतल्यामध्ये दोन वेळा 'तरीही' हा शब्द गरजेचा नाही. एकच 'तरीही' पुरेसा अर्थ स्पष्ट करतोय. त्यामुळे दुसर्यांदा झालेला त्याचा वापर गोंधळ निर्माण करतोय. पृथ्वी गोल मध्येही 'तरीही' हा शब्द अनावश्यक आहे. तो न वापरताच अर्थ स्पष्ट होतो.
इतर शेरही परिणामकारक वाटले नाहीत.
केवळ रदीफ-काफिया आवडल्यामुळे शेर रचले गेले आहेत असे वाटते. त्यामुळेच त्या शब्दांची शेरामध्ये अर्थ स्पष्ट होण्यासाठी गरज आहे की नाही ह्याकडे दुर्लक्ष झाले असावे.

मला आवडली गझल

संवादाचा ढळतो आहे तोल, जरीही

असा बदल केला तर अजुन छान वाटेल !

आवडली !

संवादाचा ढळतो आहे तोल, जरीही

असा बदल केला तर अजुन छान वाटेल !

आवडली !

` माहोल `चा शेर वगळता गझल फार आवडली ...
शुभेच्छा...

मलाही माहोल थोडा खटकला... पण बाकी गझल मस्तच.