अस्तित्व दान केले
अस्तित्व दान केले
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले
हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले
चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले
वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले
इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला देदीप्यमान केले
जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा "अभय" भुकेला, धारिष्ट्यवान केले
- गंगाधर मुटे
-------------------------------
या रचनेचे प्रताधिकार सुरक्षित आहेत.
-------------------------------
गझल: