आले वादळ गेले वादळ...

आले वादळ गेले वादळ कसे न मिटले
आठवणींच्या वाळूवरचे ठसे न मिटले

अंतरातला कोलाहल मी आत कोंडला
या माझ्या पण ओठावरचे हसे न मिटले

जिंकुन गेले दुर्दैवच ती कासव शर्यत
पण मनातल्या इच्छेचे ते ससे न मिटले

डोळ्यादारी प्राण ओतुनी उभी प्रतिक्षा
मिटले होते डोळे क्षणभर जसे न मिटले

जळले विझले विझले जळले ह्रदय कोवळे
हाय तरी पण तिला हवे ते तसे न मिटले

घे खांद्यावर तुच आपुली त्यागपताका
मी वचनाचा बांधिल माझे वसे न मिटले

.....अनंत नांदुरकर (खलिश)

गझल: 

प्रतिसाद

वा व्वा !
सुंदर गझल केलीत, अनंतराव. अभिनंदन !

डोळ्यादारी प्राण ओतुनी उभी प्रतिक्षा/ घे खांद्यावर तुच आपुली त्यागपताका अशा काही ओळी विशेष उल्लेखनीय आहेत.
पुढील वाटचालीस शुभेच्छा !

खलिशजी, क्या ब्बात है...
एक एक शेर खणखणीत आहे...
तुमच्या आणखी गझलांची वाट बघतोय...