पुसणारे नसताना कोणी अश्रू ढाळायचे कशाला...

पुसणारे नसताना कोणी अश्रू ढाळायचे कशाला
पतंग नसताना ज्योतीने जीवन जाळायचे कशाला

सावलीतले भास उशाशी नको नको ते चंद्र चांदणे
पोळुन निघतो चांदण्यात मी ऊनही टाळायचे कशाला

काटेरी नशीबाला घेउन काटा जपतो हळूवार मन
कोमेजुन जाताना कळते कुंपण वाळायचे कशाला

फुटलेल्या काचेत विखुरला प्रेम तुझ्यावर करणारा
आरशात मी मला दिसेना इतके भाळायचे कशाला

प्रमाणपत्रे देउन जातील अर्थ का कधी जगण्याला
मनातुनी ओठावर येते पुस्तक चाळायचे कशाला

मयुरेश साने ...३१- मे -११

गझल: