विसावा


विसावा

येत आहे मला चूक समजून माझी !
मी पुन्हा वाट पाहीन बदलून माझी !

वेळ झाली; निघावेच लागेल आता
वाट पाही कुणी दूर ठरवून माझी!

तू पुढे हात आधीच केलास का हा...?
एकदा भेट घे नीट, जवळून माझी !

या जगाच्या रिवाजात नाही कुठे मी
रीत पटली कुणाला न पटवून माझी !

काय मागून मागू तुला मागणे मी?
पालखी ने अखेरीस उचलून माझी!

या जिवाला विसावा न लाभे कुठेही...
मी घरे पाहिली रोज बदलून माझी !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

छान आहे गझल.
पुन्हा च्या चार मात्रा येतात की तीन, जरा तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.

या जगाच्या रिवाजात नाही कुठे मी
रीत पटली कुणाला न पटवून माझी !

या जिवाला विसावा न लाभे कुठेही...
मी घरे पाहिली रोज बदलून माझी

वा वा! खूप आवडले शेर!

अनिलराव, पुन्हाच्या मात्रा ३ धरा. (कोल्हापूर वगैरे विभागात तो शब्द उच्चारताना पुन्न्हा असा उच्चारला जातो, पण माझ्यामते योग्य उच्चार पुन्हा असा आहे व मात्रा ३ आहेत. जाणकार सांगतीलच!)

:)

या जिवाला विसावा न लाभे कुठेही...
मी घरे पाहिली रोज बदलून माझी ! .... प्रदिपजी सुंदर शेर...वाह... शुभेच्छा!!!

या जगाच्या रिवाजात नाही कुठे मी
रीत पटली कुणाला न पटवून माझी !

वाव्वा. मस्त.

या जिवाला विसावा न लाभे कुठेही...
मी घरे पाहिली रोज बदलून माझी !

क्या बात है.

संपूर्ण गझल अगदी आवडली.

सगळीच गझल आवडली

या जगाच्या रिवाजात नाही कुठे मी
रीत पटली कुणाला न पटवून माझी !

हा विशेष आवडला

या जिवाला विसावा न लाभे कुठेही...
मी घरे पाहिली रोज बदलून माझी !

तोडच नाही या शेराला....
निव्वळ अप्रतिम !!!

मी घरे पाहिली रोज बदलून माझी

फारच सुरेख प्रदीपजी