ऊठ तू आता तरी

सोसले अन्याय का रे? ऊठ तू आता तरी
षंढ म्हणती लोक सारे ऊठ तू आता तरी

कल्पना विश्वात रमणे शोभते का तुज असे ?
सोड ते स्वप्नील तारे ऊठ तू आता तरी

काय इतिहासात आहे? चाळसी पाने उगा
जाणण्या नवखे इशारे ऊठ तू आता तरी

भ्रष्ट सारे नष्ट करण्या आग लावावी जगा
चल जरा शोधू निखारे ऊठ तू आता तरी

म्यान का तलवार केली? आप्त ते कसले तुझे?
गारदी ते मारणारे ऊठ तू आता तरी

का धरावी आस वेडे? यावयाची राम तू
चल शिळे, थोतांड सारे ऊठ तू आता तरी

शेषशय्येवर हरी तुज झोप रे येते कशी ?
राज्य करती शोषणारे ऊठ तू आता तरी

बाटले कौटिल्य आणी रामशास्त्री आजचे
पेटवू त्यांचे निवारे ऊठ तू आता तरी

श्वासही संघर्ष होता जीवनी "निशिकांत"च्या
खेळ माझा संपला रे ऊठ तू आता तरी

निशिकांत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
E Mail :- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा

गझल: