आनंदाने

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने

पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी  ठरून जावे आनंदाने

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने
गझल: 

प्रतिसाद

सुरेख गझल आहे. आनंदाने वाचावी अशीच आहे.

अतिशय छान...! वेगळ्या अंत्ययमकाची सुरेख गझल
घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने
वा...

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने
फारच छान..

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी  ठरून जावे आनंदाने

अप्रतिम...ठरून शब्दाची वेगळी छटा दाखवणारा शेर...

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने
सुंदर....

 

सुंदर गझल! सर्वच शेर आवडले. पण "अकस्मात घर" आणि "दारावरून" खासच!!
-- पुलस्ति.

ठरून जावे चा शेर आवडला, गझल मस्त आहे.

चित्तोपंत,
अप्रतिम गझल... 'आनंदाने' ही रदीफ फारच आवडली.
अकस्मात घर भरून जावे आनंदाने
- वा! वा! वा!
नुसते दारावरून जावे आणि मक्ता-
जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने
- सुंदर!!!!
- कुमार

ही मनोगतावर यापूर्वीच वाचलेली आणि इतकी आवडलेली की मग तोंडपाठच झाली  पुन्हा पुन्हा वाचून !
आणि हा खालील शेर तर मी बरयाच जणांना ऐकवलाय आतापर्यंत .
सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने
सहीच.


घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने
..............
 
व्वा !
सुंदर गझल

तुमच्या आवाजातच जी गझल कानात रेंगाळतेय तिला काय म्हणावे?! वा! वा!

सुंदरच आहे ही गझल.
सुधीर

मस्त वाटतीये वाचायला !
मस्तच गजल !

सगळेच शेर आवडले..त्यातही हे फारच..

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी  ठरून जावे आनंदाने  

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने

खरेतर सुंदर, मनाला भावणार्‍या गझलांचा खजिनाच सापडलाय. :)

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने
क्या बात है !!
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

खूप खूप आवडली गझल! सगळेच शेर एकसे बढकर एक! तरीही खास आवडलेला शेर
पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने
क्रान्ति
{रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर,
अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने
कलोअ चूभूद्याघ्या

गझल आवडली....
डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने