तुझ्या हातात माझ्या जिंदगीचा कासरा मी देत आहे

तुझ्या निष्ठेवरी भाळून हा निर्णय नवा मी देत आहे
तुला वाट्टेल तेंव्हा यायची दु:खा, मुभा मी देत आहे

जरा संधी मिळाली की इथे चौखूर भरकटतो म्हणूनच
तुझ्या हातात माझ्या जिंदगीचा कासरा मी देत आहे

सदा 'खाऊन' ढेकर द्यायची बंदीच पाळावी मनाने
अशासाठीच त्याला मोजका आता शिधा मी देत आहे

कधीपासून आहे चाललो मी, लक्षही नाही कुणाचे
उगा का वाटले दुनियेस अकरावी दिशा मी देत आहे?

नशीबाची मला पर्वा नसे हे का तिला ठाऊक नाही?
जिचा होऊन दैवाला इशारा हा खुला मी देत आहे

तुझे सारेच नाही जात वाया राबणे माझ्याबरोबर
चिमुटभरसा तरी माझा तुला 'कणखर'पणा मी देत आहे
--------------------------------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'

गझल: 

प्रतिसाद

व्वा... आवडली गझल.

तुझ्या निष्ठेवरी भाळून हा निर्णय नवा मी देत आहे
तुला वाट्टेल तेंव्हा यायची दु:खा, मुभा मी देत आहे

जरा संधी मिळाली की इथे चौखूर भरकटतो म्हणूनच
तुझ्या हातात माझ्या जिंदगीचा कासरा मी देत आहे

कधीपासून आहे चाललो मी, लक्षही नाही कुणाचे
उगा का वाटले दुनियेस अकरावी दिशा मी देत आहे?

तुझे सारेच नाही जात वाया राबणे माझ्याबरोबर
चिमुटभरसा तरी माझा तुला 'कणखर'पणा मी देत आहे

सर्वच शेर खणखणीत आहेत...
दु:खाला मुभा देणे... अप्रतिम....

- जनार्दन

सुरेश भटांच्या नावाने हे संकेतस्थळ आहे. येथे चित्त, प्रदीपसाहेब, अनंतराव व आणखीन काही जाणकार आहेत. येथे व ऐल पैल वर गझला प्रकाशित केल्यास त्या तावून सुलाखून निघाव्यात!

या सर्वांशी चर्चा करावीत किंवा समजून घ्यावेत असे माझे वैयक्तीक मत आहे.

व्यक्तीशः मला:

कधीपासून आहे चाललो मी, लक्षही नाही कुणाचे
उगा का वाटले दुनियेस अकरावी दिशा मी देत आहे

हा व मतला व मक्ता आवडले.

धन्यवाद, अभिनंदन व शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

कैलासराव, जनार्दन,

मनापासून आभार!!

भूषणजी,

या सर्वांशी चर्चा करावीत किंवा समजून घ्यावेत असे माझे वैयक्तीक मत आहे. - अशा जाणकारांनी माझ्या गझला चर्चेयोग्य समजल्या तर ते माझे भाग्य राहील.

इथे व ऐलपैल वर गझला पोस्ट करतो आहे व काही गोष्टी शिकायलाही मिळत आहेत.

आपुलकीच्या सल्ल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!

वॄत्तात गडबड आहे का? किंवा मला माहीत नाही हे वृत्त?

प्रत्येक मिसर्‍या नंतर १२३ असे आकडे म्हणावे लागत आहेत... तेंव्हा वृत्त येत आहे.