काय आहे तुझ्याकडे माझे

नेहमीचेच हे रडे माझे
काय आहे तुझ्याकडे माझे

मीच घेतो अता धडे माझे
रोज पाडून पोपडे माझे

काय बोलायचे उन्हाळ्यांना
पावसाळेच कोरडे माझे

दोष थोडा असेल वाटेचा
पाय थोडेच वाकडे माझे

आठवण काढतो तुझी तेव्हा
बोल होतात बोबडे माझे

एक पैसा न लावता म्हणतो
आज येतील आकडे माझे

ध्येय होते जिवंत असण्याचे...
... जीवनाहून तोकडे माझे

साकडे घातल्याविना खुष हो
एवढे एक साकडे माझे

सांग या 'बेफिकीर' काळाला
प्रस्थ होते कधी बडे माझे

गझल: 

प्रतिसाद

शेवटचे दोन शेर आवडले.

चांगले आहेत.

सहजसुंदर.

साकडे घातल्याविना खुष हो
एवढे एक साकडे माझे

सांग या 'बेफिकीर' काळाला
प्रस्थ होते कधी बडे माझे
>>> हे दोन शेर खुप भावले 'भुषणराव' :स्मितः