जखमेस ओल आली....

जखमेस ओल आली....

एकांत रूक्ष माझा, फेटाळतो जरा मी...
गर्दीत माणसांच्या, रेंगाळतो जरा मी...

मज जिंकण्या मिळावा, का वाव ना कधीही??
नुसत्या 'पराभवाला', कंटाळतो जरा मी...

डोळ्यांत साठलेली, स्वप्नें तहानलेली...
निद्रेस टाळताना, ओशाळतो जरा मी...

चौफेर गोठलेला, अंधार जीवघेणा...
आयुष्य शोधताना, ठेचाळतो जरा मी...

मधुमुक्त वागण्याचा, उलटून काळ गेला!
त्या रम्य आठवांना, कवटाळतो जरा मी...

तुज पाहूनी समोरी, जखमेस ओल आली...
स्वर्गीय वेदनांना, सांभाळतो जरा मी...

आभार यातनेचे, मानून मी जराशे;
आभास हे तुझे मग, परिमाळतो जरा मी...

- निरज कुलकर्णी.

गझल: 

प्रतिसाद

व्वा..!
एकांत रूक्ष माझा, फेटाळतो जरा मी...
गर्दीत माणसांच्या, रेंगाळतो जरा मी...

तुज पाहूनी समोरी, जखमेस ओल आली...
स्वर्गीय वेदनांना, सांभाळतो जरा मी...

आवडले..!

छान गझल आहे, आवडली.

धन्यवाद!

श्री नीरज गझल खूप छान आहे .आवडली .पण दादा (सुरेश भट ) अस म्हणायचे की शब्द सांभाळून वापरा ही गझल त्यांच्या समोर वाचली असती तर ते नक्कीच म्हणाले असते ."तुझ्या मनाला कशी ओल आली मला सांग कारण माझ्या तर घराला ओल आलेली मी बघीतली आहे" .मला दादांकडून अश्या खूप गोष्टी शिकायला मिळाल्या .म्हणून सांगितलं .चूक सांगायची म्हणून नाही .गझल बाकी खूपच छान झाली आहे गैरसमज नसावा .लोभ असावा .वाढवअ
हीच अभिलाषा
स्नेहाकांशी
शोभा तेलंग इंदोरी

अप्रतिम गझल !!!

तुज पाहूनी समोरी, जखमेस ओल आली...
स्वर्गीय वेदनांना, सांभाळतो जरा मी...

खुप आवडलेला...

सुरेख गझल! सगळ्याच द्विपदी सरस!