खंत


प्रत्येक चेहरा आता विंगेत रंगतो आहे
प्रत्येक नर्मदी गोटा गंधात माखतो आहे


"मी बोलणार ना खोटे" ही शपथ वाहतो आहे
सोयिस्कर मज वाटे जो - तो अर्थ काढतो आहे


गुंडाळला रिळाला जो कोराच पाहिला होता -
-तो आज बातम्या खोट्या रंगीत दावतो आहे


चंद्रास भाकरीच्या ना मोताद राहिला कोणी
प्रत्येक पाव खाणारा मग केक मागतो आहे


लावली मीच माझ्याशी - ती पैज जिंकण्यासाठी
लावून झापडे दोन्ही बुंगाट धावतो आहे


लागीर वाटते झाले मानव्य ईश्वरालाही
देवत्व मिरवण्यासाठी सत्संग भरवतो आहे


'चोरून भोग देण्याला उरलीच वेदना नाही'
ही खंत लपवण्यासाठी आक्रोश माजतो आहे


लावाच रंग अर्थाचा भिंतींस जीवनामधल्या
तत्वज्ञ तुंबला कोणी घ्या पिंक टाकतो आहे


गझल: 

प्रतिसाद

प्रत्येक चेहरा आता विंगेत रंगतो आहे
प्रत्येक नर्मदी गोटा गंधात माखतो आहे
दोन्ही ओळी कश्या कनेक्टेड आहेत, सांगाल का?
लावली मीच माझ्याशी - ती पैज जिंकण्यासाठी
लावून झापडे दोन्ही बुंगाट धावतो आहे
चांगला शेर आहे, येथे ती हवाय का? 

मला मतला आवडला. नाना, गझल बुंगाट धावणारी असावी पण बुंगाट म्हणजे काय ? सोयिस्कर अर्थ काढणे छान, देवत्व मिरवण्यासाठी सत्संग भरवणे फार छान. मक्ताही आवडला. कल्पना मस्त आहे. पण गझल बरीचशी कळली नाही. 'चोरून भोग देण्याला उरलीच वेदना नाही' हे कळण्याइतपत हुशार असतो तर किती बरे झाले असतो.

समीर चव्हाण-
प्रत्येक चेहरा आता विंगेत रंगतो आहे
प्रत्येक नर्मदी गोटा गंधात माखतो आहे
या दोन्ही ओळी एकाच विचाराच्या दोन बाजू आहेत.
त्या कशा 'कनेक्टेड' आहेत? तर त्या विचारानेच! - कोणतीही गोष्ट - मग ती वस्तु असो, व्यक्ती असो  वा विचार असो - तिला कृत्रिम रंगरोगण करून दाखवले जात आहे. त्यामुळे तिच्यात गुण असोत की  नसोत तिचा उदोउदो होत आहे. (नर्मदी गोटा - शाळिग्राम असू शकतो किंवा नुसताच दगड. पण सध्या दोन्ही गंधात (उगाळलेले चंदन) माखल्यामुळे त्यांतला फरक कळत नाही.)
इथे उल्या मिसर्‍यात अर्धी कल्पना आणि सानी मिसर्‍यात तिचे पूर्ण झालेले स्वरूप अशी अपेक्षा असेल तर ही द्विपदी तशी नाही.
आपली वृत्ताबद्दल शंका रास्त आहे. बदल सुचला की करेन.
चित्तरंजन भट-
हेच 'बुंगाट' - 'तराट' हे शब्द मी ऐकत आलोय आणि बोली भाषेत वापरलेही आहेत. त्यांचा अर्थ एकच आहे. - सुसाट! (आता सुसाट म्हणजे तरी काय? सोसाटा म्हणजे काय? - त्याचे तत्सम, तद्भव असे कांही संदर्भ आहेत काय? असले तर मला माहित नाहित. प्रश्नकर्त्याला याबाबत काही माहित असेल तर कृपया सांगावे ही नम्र विनंती.)  तो प्रमाणभाषेने मान्य केला आहे म्हणून त्याचा वापर योग्य आणि बोलीभाषेतले बुंगाट - तराट हे शब्द अयोग्य असे का मानावे? (तर्राट म्हणजे तर्र होऊन? - बुंगाट हा 'गुंगाट' वरून आला असावा?)प्रमाणभाषा आणि बोली यांची जी चर्चा सुरू आहे तिच्यात हा शब्द शोभून दिसेल.
चोरून भोग 'देण्याला' - ऐवजी - 'देणारी' असे वाचले तर समजू शकते का? नाहीतर मग शेराचा निक्काल लागला असे वाटते.
गझलचा वरील भाग वगळता 'बरेचसे' काय कळले नाही हे समजले तर सुधारणा करता येईल.प्रस्तुत कवीची वैचारीक बैठक नक्की काय आहे ते कळले नाही असे म्हणत असाल तर तो वेगळा मुद्दा आहे.
स्वगत-
असो. प्रतिसादांवरून प्रस्तुत कवीची आकलनशक्ती जरा जादाच (१.५) असावी किंवा प्रस्तुत कवीची तथाकथित प्रतिभा सोपे शब्द वापरण्याइतकी अजून प्रगल्भ झाली नसावी असे नाइलाजाने मान्य करावे लागते.;)

आता मत्ला समजला, धन्यवाद विसुनाना. गझल परत-परत वाचल्यावर अधिकाधिक कळत आहे:
लागीर वाटते झाले मानव्य ईश्वरालाही
देवत्व मिरवण्यासाठी सत्संग भरवतो आहे
खासच आहे.

भुंगाट असा शब्द नक्की आहे. धावण्याचे विशेषण आहे.
लागीर वाटते झाले मानव्य ईश्वरालाही
देवत्व मिरवण्यासाठी सत्संग भरवतो आहे
सत्संग देव नाही भरवत. कोणितरी बुवाबाबाच भरवतात. त्यामुळे देवाला कोसण्यामागे काय उद्देश आहे कळाला नाही. की देवा बोले खोट्या-भक्ता लागे असा टोमणा आहे?
 
अभिजित
 

धन्यवाद अभिजित, भुंगाट हा शब्द 'भुंग्याप्रमाणे' वरून आला असावा. त्याचा कांही छापील संदर्भ देता येईल का?
जर सर्वोच्च करताकरविता ईश्वर असेल तर त्यालाही आपण थोडे (त्यानेच निर्माण केलेल्या माणसाप्रमाणे - {जसे लेखक स्वत्:च आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो तसे-मानवाच्या प्रेमात पडून्} )मिरवावे असे वाटल्यामुळे तोच या बाबांकरवी आपले सत्संग भरवू लागला आहे काय? -असा प्रश्न पडतो.