...म्हणाले !!

...म्हणाले !!

स्पष्ट माझ्या बोलण्याला, ’शालजोडी’ म्हणाले !
प्राणत्यागा....’अर्थ नाही....! व्यर्थ खोडी’ म्हणाले !!

राजरस्ता सोडला ना लांघल्या चौकटीही.....
नेकमार्गी चालण्याला ’नागमोडी’ म्हणाले !!

झिंगलेले, लाज ज्यांनी टांगलेली खुट्याला....
जाग येता ’जास्त झाली काल थोडी’ म्हणाले !!

ताव मारी गिध्द येथे, खाउनी माजलेले.....
’घोळवूनी कारल्या येते न गोडी’ म्हणाले !!

झापडे लावून ओझी वाहिलेली जगाची......
वृध्द होता ’एक काळी क्षुद्र घोडी’ म्हणाले !!

रांधण्याचे, वाढ्ण्याचे काम जेव्हा धकेना..
’फ़ेक आता वळचणीची ती गठोडी’ म्हणाले !!

राबताना, ओढताना प्राण त्यांनी मुकावे,
’दावणीला जून होती बैलजोडी’ म्हणाले !!

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गझल: