मोग-याचा पसारा.....(गझल)

मोग-याचा पसारा.....

तुला रोज येतो, कधीही शहारा !
निरखणे तुझे, रोमरोमी थरारा !!

उगाळू किती संयमी चंदनाला,
उरी स्पंदनांचा धुमसतो निखारा !!

जरी गुंगल्या चांदण्या दूर तेथे,
खुणावी कधीचा मला शुक्रतारा !!

सुगंधी बटांची नशा मैफ़िलीला,
तया चुंबितो स्वैर- बेधुंद वारा !!

नको जागणे अन नको हे उसासे,
तुझे श्वास गात्री, विरे हाय पारा !!

चुरावी कशाला कुणी रातराणी,
सख्या ! धुसफ़ुसीला नसावाच थारा !!

पहाटे पहाटे मिठी सैल होता,
कसा आवरु मोग-याचा पसारा ?

-सुप्रिया (जोशी) जाधव.

प्रतिसाद

चुरावी कशाला कुणी रातराणी,
सख्या ! धुसफ़ुसीला नसावाच थारा - मस्त!

गझल रंगीनच आहे.

धन्यवाद 'बेफिकीरजी' !

बेधुन्द!!!

तुला रोज येतो, कधीही शहारा !
उगाळू किती संयमी चंदनाला,

ह्या ओळी फार मस्त आहेत. गझल एकंदर छानपैकी एखाद्या रोमँटिक गीतासारखी झाली आहे.

सुदंर्...मजा आली

जरी गुंगल्या चांदण्या दूर तेथे,
खुणावी कधीचा मला शुक्रतारा !!

सही! सुंदर भावपूर्ण गझल!

पहाटे पहाटे मिठी सैल होता,
कसा आवरु मोग-याचा पसारा ?गझल छान रोमँटिक झाली आहे.