योग नाही!

सांजवेळी सोबतीला ती असावी, योग नाही!
सोबतीचे सोड, साधी भेट व्हावी, योग नाही!

मोर स्वप्नांचे तिच्या मी लाख डोळ्यांनी टिपावे,
धुंद ती व्हावी, भुलावी, मोहरावी, योग नाही!

ती मला देऊन गेली श्रावणाची चिंब गाणी,
मी तिची गीते ऋतूंना ऐकवावी, योग नाही!

ती व्यथेच्या चक्रव्यूहातून वाटा शोधताना,
मी दिशा माझ्या घराची दाखवावी, योग नाही!

मीहि संध्येचा प्रवासी, तीहि होती सांजवेडी
संगतीने वाट दोघांची सरावी, योग नाही!

एकट्याने पेलणे ही वादळे आता स्मृतींची,
लाट यावी, ती फुटावी, ओसरावी, योग नाही!

गझल: 

प्रतिसाद

सुंदर गझल आहे.

फार सुरेख गझल..... वेगळी रदीफ.. हरेक शेर खणखणीत. :)

वा वा!
मोर स्वप्नांचे हा शेर मस्तच.

ती व्यथेच्या चक्रव्यूहातून वाटा शोधताना,
मी दिशा माझ्या घराची दाखवावी, योग नाही
क्रांती,मित्रा माझ्या मनातलं कसं काय कळलं तुम्हाला ?हा शेर प्रचंड भावला.कितीचे प्रमाण कसे सांगू ?"हे शब्देविण संवादिजे .."यार !आख्खी गझल बेहद आवडली

क्या बात है!

ती व्यथेच्या चक्रव्यूहातून वाटा शोधताना,
मी दिशा माझ्या घराची दाखवावी, योग नाही!

अगदी उत्तम! वा. अगदी लाघवी झाली आहे गझल.

शतशः धन्यवाद!

सुंदर!!!!!!!
फार फार आवडली... :-)

छान.
सर्वच शेर आवडले.

सांजवेळी सोबतीला ती असावी, योग नाही!
सोबतीचे सोड, साधी भेट व्हावी, योग नाही!

ती व्यथेच्या चक्रव्यूहातून वाटा शोधताना,
मी दिशा माझ्या घराची दाखवावी, योग नाही!

क्या बात है!