''सावली''
प्रेमभावना न रोखली कधी मनात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
बांधला महाल मी तुला सुखात ठेवण्या
घर कधी करेन गे तुझ्याच काळजात मी?
साथ लाभता तुझी,कसे तरुण वाटते
केस पांढरे तरी अजून यौवनात मी
मीच येत राहिलो नि मीच जात राहिलो
तू न भेटलीस शोधले कणाकणात मी
घेवुनी हजार मुखवटे जगायचे इथे
का स्वतःस शोधतो उगाच आरशात मी?
जीवनात पोकळी, तुझ्या उपस्थितीविना
जिंदगी भरीव ''त्वा'' मुळे,तुझ्या ऋणात मी
काळ-वेळ विसरलोय गुंतुनी तुझ्यात की,
लख्ख कोरडा असेन ऐन श्रावणात मी
लाख लोक मानती,मला अधार आपुला
शोधतो सदा तुझा अधार संकटात मी
----डॉ.कैलास गायकवाड
गझल: