जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी...

बेगडी तेजाळुनी अंधारतो मी शेवटी
जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी

खूपदा परिपक्वतेने वावरावे लागते
येउनी आईपुढे उंडारतो मी शेवटी

अडगळीला फेकतो जागेपणी स्वप्ने जरी
शोधुनी... झोपेत ती साकारतो मी शेवटी

फक्त मुद्देसूदही बोलून कोठे भागते?
लाच मौनाची जगाला चारतो मी शेवटी

फायदा उंचीमुळे झाला कुठे काही मला?
माणसांची छप्परे शाकारतो मी शेवटी

राग माध्यान्ही कुठे सूर्यावरी मी काढतो?
सांजवेळी सावली पिंजारतो मी शेवटी

मान खाली घालुनी बाहेरच्यांना सोसतो
आपल्यांच्यावर घरी फुत्कारतो मी शेवटी

लाभली खोटे खर्‍याला मानणारी माणसे
थाप वैतागून त्यांना मारतो मी शेवटी

तत्ववेत्ते, संत, जेते, शंभरावरती कवी
संपले ते सर्व की आकारतो मी शेवटी

ग्रंथ अभ्यासून जेव्हा ओळही नाही सुचत
आत डोकावून... बाजू सारतो मी शेवटी

एकदा माझ्याघरी येऊन अभ्यासा मला
जिंकतो तो 'बेफिकिर' अन हारतो मी शेवटी

गझल: 

प्रतिसाद

वा !
वेगळी गझल.
पहिले पाच शेर चांगले.
आवडले.
राहिलेल्या शेरांबाबत पुनर्विचार व्हावा.

वा !
वेगळी गझल.
पहिले पाच शेर चांगले.
आवडले.
राहिलेल्या शेरांबाबत पुनर्विचार व्हावा.

कुठला शेर 'कोट' करु असं झालंयं.... अप्रतिम... सगळी गझलच फार आवडली...!

अप्रतिम.

माणसांची छप्परे शाकारतो मी शेवटी
सुंदर.

लाजवाब !
प्रत्येक शेर सव्वाशेर आहे ! 'बहर'शी सहमत.
-----------------------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

सर्वांचा आभारी आहे.

-'बेफिकीर'!

एकंदर चांगली झाली आहे गझल.

खूपदा परिपक्वतेने वावरावे लागते
येउनी आईपुढे उंडारतो मी शेवटी

मस्त!

अडगळीला फेकतो जागेपणी स्वप्ने जरी
शोधुनी... झोपेत ती साकारतो मी शेवटी

भन्नाट!

मान खाली घालुनी बाहेरच्यांना सोसतो
आपल्यांच्यावर घरी फुत्कारतो मी शेवटी
छान गझल दिली बेफिकीरजी, सगळी गझलच खुप छान आहे.आणि हा शेर तर माझ्या मनातला आहे .अप्रतिम !!

बेगडी तेजाळुनी अंधारतो मी शेवटी
जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी
अप्रतिम !!

आभारी आहे सर्वांचा!

खूपच छान!!!!!!