मलूल पडलेले जेव्हा गुलदान पाहतो हृदयाचे

मलूल पडलेले जेव्हा गुलदान पाहतो हृदयाचे
शिंपडतो मी त्यांच्यावरती थेंब तुझ्या आवाजाचे

द्वैताच्या सीमेपाशी प्रार्थना अशी आली मोठी
तुझा चेहरा आठवला, आभार मानले देवाचे

दुनियादारी ओलांडुन मी खूप दूर आलो आहे
नाहीतर सांगितले असते चरित्र एकाएकाचे

दुःखाविषयी कसे छानसे बोलावे ते कळते, पण
समजत नाही कसे पुसावे अश्रू एकामेकाचे

छान जरी चर्चा झाली कोंडी काही फुटली नाही
कुणीतरी बोलले पाहिजे होते तेव्हा टोकाचे

फार दिवस ऐकली कौतुके काही नवीन मुखड्यांची
बघायला गेलो तर दिसले सगळे एका छापाचे

कधी व्यापता आला नाही अणूएवढा बिंदूही
कधी तोकडे पडले अंगण भव्यदिव्य आभाळाचे

--- चंद्रशेखर सानेकर

(लाजरी, दिवाळी २०००२)

प्रतिसाद

मलूल पडलेले जेव्हा गुलदान पाहतो हृदयाचे
शिंपडतो मी त्यांच्यावरती थेंब तुझ्या आवाजाचे
व्वा...

काही वेगळे जाणवते आहे. अवर्णनीय!
द्वैताच्या सीमेपाशी प्रार्थना अशी आली मोठी
हे जरा कळले नाही.