अजूनही

मनामध्ये कुठे कुठे तुझे ठसे अजूनही
फुलांत राहिले सुगंध खूपसे अजूनही

दिशा दिशा जरी तमास शरण जाऊ लागल्या
लपून राहिलेत आत कवडसे अजूनही

दिशा ढगाळताच मी तुझीच वाट पाहतो
नभात दाटतात रोज भरवसे अजूनही

तुम्ही किती मुजोर राख पसरलीत गावभर
निमूट थंड झोपलेत कोळसे अजूनही!

उगाच चेहरा पुन्हा पुन्हा पुसून पाहतो
तसेच काळवंडतात आरसे अजूनही
- नचिकेत जोशी

गझल: 

प्रतिसाद

मनामध्ये कुठे कुठे तुझे ठसे अजूनही
फुलांत राहिले सुगंध खूपसे अजूनही

वा. फार ओघवता.

दिशा दिशा जरी तमास शरण जाऊ लागल्या
लपून राहिलेत आत कवडसे अजूनही

वा. छान. लपून राहण्यापेक्षा दुसरे काही हवे होते असे वाटून गेले.

उगाच चेहरा पुन्हा पुन्हा पुसून पाहतो
तसेच काळवंडतात आरसे अजूनही
एकंदर छानच. खालची ओळ फार मस्त.

एकंदर गझल अगदी छान झाली आहे.

अतिशय सुरेख गझल! "भरवसे" हा शेर खूप खूप आवडला!

सुंदर!!!!!, आवडली....

धन्यवाद चित्तजी, क्रान्ति, शाम! :-)