असे प्रेम देवा

सहज गीत ओठी कुणी गुणगुणावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे
जणू शिंपल्यातून मोती वसावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

किती छाटले झाड फुटती धुमारे, किती मेघ  आले विझे सूर्य कारे ?
किती, वार झेलूनही ना मिटावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

जशी भेटते ती नदी सागराला, जशी लाट शोधून गाठे किनारा
जळावीण मासे जसे तडफडावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

जरी जीवनाच्या दिशा भिन्न झाल्या,  कधी धुंद अथवा कधी खिन्न झाल्या
तरीही मनांनी मनांतच वसावे ,   असे प्रेम  देवा नशीबी  असावे

धरा सांग चंद्रा कधी भेटते का,  पहाटेस  संध्या कधी गाठते का
तशी जाणती साथ  देण्या असावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

कधी दक्षिणा ना धरा  मागते(रे) , कधी दाम प्रेमास का माय घेते
सदा प्रेम निरपेक्ष हृदयी ठसावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

उगा ध्यान बगळ्यास भावे कशाला, उगा मकर नेत्रात आसू कशाला
अशा मृगजळा ना कधीही फसावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

सदा संत गाती तुझे नाम भावे, अनंता तुझे रूप कोणा न ठावे
तरी आळवीता मिळावे विसावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

विराटा तुझे रूप गगनी दिसावे, कधी सूक्ष्म रूपी तुझे भास व्हावे
न दिसता जसे गंध ते दरवळावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे. . . .

सुधीर

गझल: 

प्रतिसाद

जशी भेटते ती नदी सागराला, जशी लाट शोधून गाठे किनारा
जळावीण मासे जसे तडफडावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

वा! फारच आवडले.सुधीरराव आपण मोठे वृत्त छान सांभाळले आहे आणि भरपूर शेर लिहिले आहेत. आपल्या गझलेतली प्रासादिकता आवडली.  ह्या गझलेला गझलसदृश्य गीतही म्हणता येईल. जुनी वळणे (तुझे नाम भावे), भरीचे शब्द, संस्कृतप्रचुर शब्द(मकर नेत्र) लिहून लिहून दूर होतील असे वाटते. पुढील गझलांना शुभेच्छा!

धरा सांग चंद्रा कधी भेटते का,  पहाटेस  संध्या कधी गाठते का
तशी जाणती साथ  देण्या असावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे
हा शेर फार आवडला! छान जमलीय गझल...!

जशी भेटते ती नदी सागराला, जशी लाट शोधून गाठे किनारा
जळावीण मासे जसे तडफडावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे
रदीफ ध्यानात ठेवल्यास वरील शेर पहिल्या ओळीतच संपतो असे वाटते. मला वाटते हा पसरटपणा गझलच्या तब्येतीला न मानवणारा आहे. बाकी चित्तरंजन यांच्याशी सहमत.

गझल छान आहे

चित्तरंजन भट, नितीन, समीर चव्हाण, अनंत ढवळे
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
सुधीर