आपुलिया बळें-८


कविता हा संघर्ष असतो आणि आयुष्य त्याहुनी बिकट संघर्ष असतो. आणि केवळ एक कवी म्हणून 'तटस्थ', निवांत व सुखरूप जगूच शकलेलो नाही. म्हणून या पुस्तकाला जरा (फक्त दहा वर्षे!) उशीर झाला.
पुन्हा सांगतो : माझी ही प्रस्तावना नेहमीची 'प्रस्तावना' नसून ही माझी काव्यविषयक भूमिका आहे. आणि जिवंत माणसांशिवाय कवितेला आणि एकूण साहित्यालासुद्धा  अर्थ नसल्यामुळे अर्थातच माझ्या या लिहिण्याला अटळ सामाजिक संदर्भ आहेच. आता हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर कोण काय म्हणेल, याची खरोखरच मला फिकीर नाही. या बाबतीत मी पूर्वी लिहिलेल्या एका गझलेतील काही ओळीच पुरेशा आहेत :--
तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही !
मी जिवंत आहे-- माझा हा प्रमाद नाही !
मैफलीत मंबाजींच्या का म्हणून बोलू?
कुणालाच कोणाचीही इथे दाद नाही!
सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी...
बाद होत गेले सारे, मीच बाद नाही !
जर मला माझ्या उरलेल्या इच्छांची थोडीबहुत पूर्ती करणारे आयुष्य मिळाले तर मी अजून लिहीन. उदाहरणार्थ, आता मला माझ्या आयुष्यातील खासखास 'वेचक' आठवणी असलेले 'जीवना, तू तसा! मी असा !' , हे एक आत्मनिवेदनपर पुस्तक लिहायचे आहे. माणूस मेल्यानंतर काही लोक त्याच्याविषयी 'आठवणी' सांगतात, किस्से सांगतात. पण मी हयात असतांनाच मला माझ्या जगण्याच्या 'वेचक' आठवणी सांगायच्या आहेत.
काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक...
तेंव्हाही मी त्यांच्या आसवांत नसणारच !


जर मला माझ्या उरलेल्या आयुष्याने सवड दिली, पुरेसा निवांतपणा दिला, तर मी माझ्या आठवणींचे हे पुस्तक 'याचि देही, याचि डोळा' लिहून तो हिशेब थोडासा पूर्ण करीन, मी जे आणि जेवढे लिहू शकलो असतो, ते आणि तेवढे लिहू शकलो नाही, याची मला निश्चित खंत वाटते. पण मी आजपर्यंत पुरसे का लिहू शकलो नाही ?, या एकाच प्रश्नाचे उत्तर कुणी शोधले काय? असो.  आता मी 'व्यक्तिगत' लिहू लागलो. क्षमस्व थांबतो.


या काव्यसंग्रहातील रचना वाचून आणि ऐकून मला अनेक लोकांनी उपयुक्त सूचना केल्या. मला माझ्या काव्यातील कमजोर शब्द व ओळी दाखवून दिल्या. या सुहृदांत सर्व पेशांतील लोक आहेत. जात, धर्म किंवा जिल्ह्याचा सवालच नाही !! मला मार्गदर्शन करणाऱ्या या सर्वांची नावे येथे देणे अशक्य आहे. म्हणून मी हात जोडून माझ्या या सर्व मार्गदर्शकांचे येथे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो.


आता माझे म्हणाल, तर मी काव्यसंग्रहाच्या बाबतीत अगदी बिनधास्त आहे. कारण सारा महाराष्ट्र माझा कृपावंत सखा आहे.


"आपुलिया बळे | नाही मी बोलत | सखा कृपावंत | वाचा त्याची ||"


सुरेश भट
२६ जानेवारी १९९४