आपुलिया बळें-६
येथे मला आणखी हेही सांगणे आवश्यक आहे की, प्रेमाशिवाय माणुसकीला अर्थ नसल्यामुळे मी प्रेमकविता लिहिणाऱ्या कवींना 'प्रतिगामी' समजत नाही. (शिवाय कोणत्याही बाळासाहेबाचा प्रश्न आला रे आला की, स्वतःला लोकशाहीवादी, प्रक्षुब्ध, झुंजार, पुरोगामी, विद्रोही किंवा दलित वगैरे म्हणवून घेणारे चामडीबचाऊ कवी दोन पायांत शेपूट घालून कसे गप्प बसतात, हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. तर ते जाऊ द्या.) मानवी प्रेम जगाला सुंदर बनवते, पण ज्या जगात प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, सुगंध, संगीत, साहित्य आणि अजून कितीतरी सुंदर गोष्टी आहेत, ते जग हृदय असलेल्या जिवंत माणसांनी जगण्याच्या लायकीचे बनले पाहिजे. कविता जगाला सुंदर बनविते किंवा निदान त्याची कुरूपता तरी कमी करते. म्हणूनच कविता म्हणजे माणुसकीच्या विजयासाठी सुरू असलेल्या सनातन संघर्षाचा एक अविभाज्य भाग होय.
जेथे द्वेष, हिंसा, संकुचितपणा, स्वार्थ व अहंकार असतो, तेथे कविता नांदूच शकत नाही. केवळ शब्दांची चतुराई किंवा लुसलुशीत आत्मवंचनेची ललित मुजोरी म्हणजे कविता नव्हे. ज्या वेळी कवी स्वतःच्या सुखदुःखांबरोबर इतर माणसांच्या सुखदुःखाचेही भान ठेवतो, त्यावेळीच त्याची कविता विश्वात्मक बनून तो कवी आपोआप महान बनतो.
या बाबतीत थोर उर्दू कवी अहमद 'फ़राज़' यांचा एक शेर आम्हा कवींना सर्व काही सांगून जातो :
ग़मे-दुनिया को ग़मे-इश्क़ में शामिल कर लो
नश्शा बढ़ता है, शराबें जो शराबों में मिले !
अर्थ-- आपल्या स्वतःच्या इश्काच्या दुःखात साऱ्या दुनियेचे दुःख सामावून घ्या. ही दोन्ही मद्ये एकत्र मिसळून त्यांचे 'कॉकटेल' झाले, तर नशा अजून वाढते !
म्हणून लिहिणाऱ्याने फक्त स्वतःच्याच दुःखाचे किंवा स्वप्नांचे जाहीरनामे काढायचे नसतात. कवीचे दुःख फक्त कवीचे नसावे. त्याची कविता जरी वरकरणी स्वतःची असली, तरीसुद्धा त्याच्या शब्दांतून साऱ्या माणसांचे दुःख बोलले पाहिजे. कवीचे दुःख विश्वाच्या दुःखाचे प्रतिनिधी असते.
हया ले के चलो, कायनात ले के चलो !
चलो तो सारे ज़माने को साथ ले के चलो !
ज्याच्या हृदयात इतरांविषयी आस्था, प्रेम, जिव्हाळा किंवा कळवळा असतो, त्याचाच ही जनता 'कवी' म्हणून कायम स्वीकार करते, हे सत्य आम्ही विसरू नये. उदा. कबीर किंवा तुकाराम महाराज.
आम्ही कवी जणून महाराष्ट्राचे सांस्कृतिक सावकार आहोत आणि जणू मराठी माणसांवर उपकार करण्यासाठीच आम्ही लिहीत आहोत, अशा भ्रमात राहू नये. या करोडो मराठी माणसांच्या महासागरात आमचे नेमक स्थान कोणते, हे आम्हाला ओळखता आले पाहिजे. आमचे अस्तित्व आणि आमचा तथाकथित मोठेपणा या मराठी माणसांच्या रसिक सहृदयतेवर अवलंबून आहे. ज्यांना त्यांच्या गल्लीतला परीट किंवा कोपऱ्यावरील सलूनमधील न्हावीसुद्धा ओळखत नाही, अशा जगप्रसिद्ध कवींनी 'बरें झालें कुणबी झालों | नाहीं तर दंभें असतों मेलों || ' ही तुकोबांची वाणी कधीही विसरू नये. कोणताही वर्गीय अहंकार नसलेले सामान्य लोक हेच अस्सल रसिक आणि बुद्धिवान असतात. त्यांना जी कविता चटकन समजते, ती कविता यशस्वीच ठरते, हा माझा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे.