~ शामकांती सांजवेळी ~

शामकांती सांजवेळी, चांदणे माळीत जावे
शारदाच्या यौवनाला, रे दिला टाळीत जावे
..

ना भरोसा चांदराती, भाळलेल्या त्या क्षणांचा
सज्जनांनी सज्जनांचे, वायदे पाळीत जावे
..

चांद आहे साक्षीला, चांदणीही लाजलेली,
मग कश्याला भारलेले, तारुण्य जाळीत जावे ?
..

पौर्णिमेला गर्व होतो, गौरकांती यौवनाचा
चांदव्याने का अताशा, पौर्णिमा न्ह्याळीत जावे ?
..

यौवनेची साद येता, पांघराया चांदणे ते
विझलेल्या काजव्यांनी, मागच्या ओळीत जावे
..

शाम आहे शामकांती, रात आहे गौरवर्णी
शारदाच्या याच राती, स्नेह ते ढाळीत जावे.
..

- रमेश ठोंबरे

गझल: 

प्रतिसाद

..
.ना भरोसा चांदराती, भाळलेल्या त्या क्षणांचा
सज्जनांनी सज्जनांचे, वायदे पाळीत जावे

अआहाहा!!!

मस्त जमलिय चांदरात.

ना भरोसा चांदराती, भाळलेल्या त्या क्षणांचा
सज्जनांनी सज्जनांचे, वायदे पाळीत जावे
व्वा! हा शेर आवडला.

मात्र, या दोनही शेरातील वृत्त तपासावे....
चांद आहे साक्षीला, चांदणीही लाजलेली,
मग कश्याला भारलेले, तारुण्य जाळीत जावे ?
--- इथे पहिली ओळ पहा. 'साक्षिला' असे करावे लागेल. तसेच 'चांद आहे साक्षिला अन...' अन घ्यावा लागेल.
दुसर्‍या ओळीत 'कशाला' असे असावे लागेल. त्याचप्रमाणे 'तारुण्य' वृत्तात बसत नाही.
म्हणून 'तरुणपण' किंवा 'यौवना' जाळीत जावे - असे करावे लागेल.

यौवनेची साद येता, पांघराया चांदणे ते
विझलेल्या काजव्यांनी, मागच्या ओळीत जावे
--- या शेरात 'वीझलेल्या' असे करावे लागेल.

पुलेशु.