बंडखोरी

रुढींची भिंत त्याने पाडली
मनाची बंडखोरी वाढली

उरे माझे अभागी झोपडे
पुरी वस्ती जरी ओसाडली

चला, बोली करा, भगवंत घ्या
इथे श्रद्धा विकाया काढली

जरासे स्वच्छ, हलके वाटले,
मनाची ओसरी मी झाडली

जगाचे ऐकले अन् वागले,
तरी तोंडे किती वेंगाडली!

व्यथे, आता तरी तू हो सुखी,
तुझ्यासाठी सुखे लाथाडली

विठू, दे घोंगडी, आताच मी
कुडीची जीर्ण चादर फाडली

गझल: 

प्रतिसाद

जरासे स्वच्छ, हलके वाटले,
मनाची ओसरी मी झाडली

हा शेर खूप आवडला....

सुंदर गझल.

उरे माझे अभागी झोपडे
पुरी वस्ती जरी ओसाडली
वावा! फारच आवडला.

जगाचे ऐकले अन् वागले,
तरी तोंडे किती वेंगाडली!

वाव्वा.

एकूण गझलच सुबक व सुरेख! फार आवडली.

सगळी गझल वाचून झाल्यावर मतला इतका आवडला कि बाकी लिहीत नाही. कुडी आणि घोंगडी ची सांगड मस्त बसली आहे. बाकी गझल पुन्हा वाचेन. पण अत्ता मतलाच पुरे!!!