बदललास तू सहजच रस्ता आता तो सवयीचा झाला

नकोस वेडे प्रश्न विचारू माझ्यापाशी उत्तर नाही
उघडे पडले घाव जुने तर झाकायाला अस्तर नाही

किती वेळ अन दिवस भेटलो याची कोणी गणती केली
त्या त्या वेळी असे म्हणालो आता भेटू नंतर नाही

बदललास तू सहजच रस्ता आता तो सवयीचा झाला
सवयीचा नक्की झाला कि त्यावाचून गत्यंतर नाही

समीप आलो उगिच वाटले खरे समांतर चालत होतो
किती बदलले रस्ते तरिही आपल्यामधले अंतर नाही

नको दरवळू अशी तू तरी तुझा गंध माझ्यात असू दे
बागेमध्ये फूल व्हावया माझ्यापाशी अत्तर नाही

गझल: 

प्रतिसाद

गत्यंतर.. अंतर... आवडले. छान गझल.

वाव्वा. अतिशय सुंदर गझल कैलासराव.
दुसरा आणि तिसरा शेर फारच सुरेख.

येऊ द्या आणखी.

सुरेख.
मतला आणि नंतर मस्तच.

वा. पहिले चारही शेर चांगले झाले आहेत.

समीप आलो उगिच वाटले खरे समांतर चालत होतो
किती बदलले रस्ते तरिही आपल्यामधले अंतर नाही
खालची ओळ बहुधा वृत्तात नाही. दोघांमध्ये कदाचित चालून जावे.

चित्तदा
समीप आलो उगिच वाटले खरे समांतर चालत होतो
किती बदलले रस्ते तरिही दोघांमधले अंतर नाही

असे केले तर चालेल ना?

सुंदर गझल! खूप आवडली.

आपल्यामधे असे हवे आहे का? तसेच, त्यावा'चु'न हवे आहे का?

गझल फार आवडली.

अभिनंदन!

-'बेफिकीर'!

वा! गझल आवडली.

सगळी गझल आवडली. खूप छान!!!