जरासा...
ताठला होता जरासा...
मोडतो रस्ता जरासा...
ओळखे तेंव्हा मला मी
विसरलो आता जरासा...
चिघळती भेगा मनाच्या
वाफसा येता जरासा...
थांबते चर्चा अशी का?
मी तिथे जाता जरासा...
पिंजराही मित्र होतो?
बोलतो तोता जरासा...
तोच आहे तीरकमठा
हा नवा भाता जरासा...
लोकशाही धन्य झाली
लाजतो नेता जरासा...
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 24/05/2007 - 14:47
Permalink
लोकशाही धन्य झाली
लोकशाही धन्य झाली
लाजतो नेता जरासा...
वाव्वा! क्या बात है विसुनाना! फारच मस्त.
चिघळती भेगा मनाच्या
वाफसा येता जरासा...
वाव्वा! 'पिंजरा' आणि 'तीरकमठा'ही छान.
'जरासा' ह्या रदीफमुळे काही बंधने आली आहेत. त्यामुळे शेर काही ठिकाणी अधुरेसे वाटू शकतात.
आभाळ
गुरु, 24/05/2007 - 16:46
Permalink
क्या बात है!!
रोखठोक गझल आहे!
पिंजराही मित्र होतो?
बोलतो तोता जरासा...
लोकशाही धन्य झाली
लाजतो नेता जरासा...
हे विशेष आवडले.
धोंडोपंत
गुरु, 24/05/2007 - 17:24
Permalink
छान
विसुभाऊ,
ग़ज़ल छान आहे. आवडली.
थांबते चर्चा अशी का?
मी तिथे जाता जरासा...
क्या बात है ! सुंदर
पण अलामतीला तिरडीवर ठेवून लिहिल्यासारखी वाटते. हलकेच घ्या. राग मानू नये.
आपला,
(छिद्रान्वेषी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
विसुनाना
गुरु, 24/05/2007 - 18:22
Permalink
अलामतभंग??
अलामतभंग आहे का? की गैरमुरद्दफ गझल आहे?
मतल्यात सानी मिसर्यात "रस्ता" आल्याने "ता" हा काफिया नसून तो "जरासा" हा आहे. तसेच ही गझल गैरमुरद्दफ आहे. असे पाहिले तर "आ" ही अलामत होते. असे माझे मत. हे बरोबरच आहे असा माझा आग्रह नाही.
धोंडोपंतांच्या शंकेत राग मानण्यासारखे काहीही नाही. ती योग्यच आहे.
म्हणून जाणकारांनी अधिक माहिती द्यावी. तसेच या गझलेत व्याकरणाची चूक आढळल्यास विश्वस्त/ संपादकांनी 'विचाराधीन' मध्ये घालावी ही नम्र विनंती...
(संदर्भ : बाराखडी-
हरेक आवाज आज अर्ध्यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला)
आभाळ
गुरु, 24/05/2007 - 18:12
Permalink
मला वाटते..
ही 'आ' स्वरकाफिया असणारी गझल आहे..
अलामत भंग नाहीये.
जाणकार सांगतीलच.
धोंडोपंत
गुरु, 24/05/2007 - 19:36
Permalink
विचाराधीन नको चर्चा करा
विसुभाऊ,
तुमच्या मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. "विचाराधीन" नावाच्या बरणीत या ग़ज़लेचे लोणचे घालण्यापेक्षा खुली चर्चा व्हावी, त्यातूनच तुमचे आणि आमचेही गैरसमज दूर होऊन मराठी ग़ज़ल सशक्त होईल असे वाटते.
त्यासाठीच हे व्यासपीठ आहे. असो.
आता मूळ मुद्याकडे वळतो.
आपण जो दादांच्या शेराचा संदर्भ घेतला आहे, तो घेऊनच पुढे जातो.
(संदर्भ : बाराखडी-
हरेक आवाज आज अर्ध्यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला)
वरील शेरात "टलेला" या न बदलणार्या अक्षरांआधी येणार्या अक्षरात "आ" हा स्वर आलेला आहे.
मतल्यामध्ये या शेराची जी जमीन स्पष्ट झाली त्यानुसार छा= छ+आ आणि सानी मिसर्यात फा = फ + आ आला आहे. त्यानुसार "आ" ही अलामत स्पष्ट झाली .
त्यामुळे या ग़ज़लेतील पुढील सर्व क़वाफी हे "आ" ही अलामत घेऊनच येतील.
उदा. लाटलेला, आटलेला, दाटलेला, वाटलेला वगैरे.
या ग़ज़लेत पेटलेला, खेटलेला, रेटलेला वगैरे क़वाफ़ी येणार नाहीत कारण त्यांची अलामत ए आहे.
आपण ती सर्व ग़ज़ल पाहू . त्यामुळे मुद्दा स्पष्ट होईल आणि शंका दूर होतील.
या ग़ज़लेचे पुढील शेर पहा
म्हणू नका की, मला कधीही रडू न येई
गळ्यात या हुंदका न माझाच दाटलेला
अता जरी हे उदास आनंद सोबतीला
पुन्हापुन्हा आठवे मला काळ काटलेला
कधी न मी सापडेन माझ्या घरी कुणाला
असेन या सामसूम लोकांत वाटलेला
तुम्हीच माझे हिरावले ओठ अन् तरीही
मलाच माझा सुनावता शब्द लाटलेला
जिथेतिथे आरती सुखाच्या सजावटीची
घरोघरी नाईलाज रेखीव थाटलेला
अता किती खोलखोल ही अंतरे तपासू?
झरा झरा झुळझुळून केव्हाच आटलेला
अरे कुणी चोरला उद्याचा पहाटतारा?
उजेड येई दिव्यादिव्यातून बाटलेला
उगाच घालू नका गुलाबी मला उखाणे
तुम्ही धरा वाट आपुली - मी झपाटलेला !
आपला,
(ससंदर्भ) धोंडोपंत
अगदीच नाईलाज असेल आणि मात्रांमध्ये बदल होत नसेल, तर अलामत बदलण्याची "सवलत" कवी घेऊ शकतो. एखादी शेर खूप ऊंचीचा आहे आणि क़ाफ़िया तंग असेल तर एक तडजोड म्हणून ते चालू शकतं, कारण एखादा खूप चांगला शेर फुकट जाऊ नये हा त्यामागे उद्देश असतो. पण सरसकट अलामतीकडे दुर्लक्ष करून ग़ज़ललेखन करणे हे लोभसवाणे ठरत नाही. तांदुळाचा खडा दातात यावा, तसा तो क़ाफ़िया खटकतो. असो.
आपला,
(विस्तृत) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
धोंडोपंत
गुरु, 24/05/2007 - 19:53
Permalink
स्वरांचा क़ाफ़िया आणि रदीफ़
मतल्यात दोन्ही मिसर्यात ता असल्यामुळे स्वरांच्या क़ाफ़ियाच्या अंगणात ही ग़ज़ल जात नाही.
स्वरांचा क़ाफ़िया वापरायचा असेल तर मतल्यात योग्य तो बदल करून, तसा संदेश वाचकांपर्यंत/ श्रोत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. पण इथे दोन्ही मिसर्यात ता आहेच. तो बदलत नाही त्यामुळे त्या "ता " च्या आधिच्या अक्षरावर अलामत येऊन थबकते. त्यामुळे सध्या हयात असलेल्या मतल्यात ही बाब बाद ठरते.
जरासा एवढा ढळढळीत रदीफ़ असता ही गैरमुरद्दफ़ कशी हे कृपया स्पष्ट करावे. तो बदलला असता तर ती गैरमुरद्दफ़ झाली असती. पण तसे दिसत नाही. या मुद्द्यावर कृपया स्पष्टीकरण द्यावे म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल.
आपला,
(अडाणी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
पुलस्ति
शुक्र, 25/05/2007 - 02:27
Permalink
मस्त गझल.. आणि रदीफ्/काफियाबद्दल..
नाना, गझल मस्तच आहे! चर्चा आणि नेता शेर तर खास आहेत!!
आता रदीफ-काफियाबद्दल मला असे वाटते -
"जरासा" हा रदीफ आहे याबद्दल दुमत व्हायचे कारण नसावे. "ता" आणि "स्ता" ही भिन्न अक्षरे आहेत. "स्ता" मध्ये "ता" येत असला तरी हे (जोड-)अक्षर "स्ता" हेच आहे. अर्थात जमीनीत अक्षर-काफिया नाही. परंतू, (वर आभाळाने म्हटल्याप्रमाणे) स्वर "आ" आहे म्हणून हा स्वर-काफिया आहे. स्वर-काफिया असल्यामुळे अलामतच नाहीये तर ती भंगण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
-- पुलस्ति.
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 25/05/2007 - 10:10
Permalink
शेर २, ४, ७ आवडले
मस्त गझल!!!
अनंत ढवळे
शुक्र, 25/05/2007 - 11:51
Permalink
धोंडोपंताची नुक्तेबाजी !
मराठीमध्ये अद्याप तरी नुक्त्याला मान्यता मिळालेली नाही , तेंव्हा ही टिंबांची आतषबाजी कशासाठी ?.दुसरे असे , विसुनानाने हा प्रयोग जाणतेपणी केलेला दिसतो.धोंडोपंताने आपले ज्ञान वाढवावे .कसेटछाप बाजारू गझला ऐकण्याऐवजी थोडेफार वाचले तर ( वाचता येत असेल तर ) धोंडोपंत फायद्यात राहील.
विसुनाना
शुक्र, 25/05/2007 - 16:17
Permalink
चर्चा व्हावी.
ही गझल लिहिताना काही नवे लिहावे असे जरूर वाटत होते. पण अलामतीवर करामत करावी असे मनात नव्हते.
मतल्यात 'होता' आणि 'रस्ता' वापरून गझलची जमीन 'आ' या आलापावर काफिया घेत होती.
'ता' हे अक्षर काफिया होत नाही असे वाटले.('स्ता' हे मराठीतले जोडाक्षर 'ता' पेक्षा वेगळे आहे. 'रसता' असा शब्द मराठीत नाही.)
पुढे सगळ्या द्विपदींमधे 'ता' हेच अक्षर घेतले तरी त्या कवाफी होत नसाव्यात. मुद्दाम दुसरी व्यंजने घेऊन स्वरकाफिया पक्का करावा असा नियम आहे काय?
ना रवा कहिये ना सजा कहिये
कहिये कहिये मुझे बुरा कहिये
या 'दाग'च्या गझलेत -
'आ' हा स्वरकाफिया आहे (हे बरोबर आहे ना?). पुढे अलामत म्हणावी तर?! -
बर्मला कहिये , ये क्या कहिये ,मरहबा कहिये, बेवफा कहिये असे शब्द येतात. यात ल,य,ब,फ अशी वेगवेगळी व्यंजने वापरली आहेत.
त्यामुळे इथे अलामतभंग होत नसावा असे वाटते. उर्दु आणि मराठी गझलेच्या जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
अजूनही चर्चा संपली आहे असे वाटत नाही. पण याचा विचार व्हावा.
जर एकाच व्यंजनाचे यमक असेल पण दीर्घ स्वर काफिया आला तर अलामत कशी असावी /नसावी यावर एकमत झाले तर बरे होईल.
आभाळ आणि पुलस्ति यांच्या मतांबद्दल आभार.
धोंडोपंत यांचे मतही एका दृष्टीने योग्य असावे.
मी कोणी जाणकार शायर नाही. त्यामुळे चुका झाल्या तर दाखवाव्यात.
त्यातून शिकण्यासारखे खूप मिळते. "असली गझल जाणकारांच्या समोर म्हणशील तर सडलेली अंडी आणि टॉमॅटो खाशील" हे वाक्य लक्षात आहे. :)
'गझल आवडली' सांगणार्या सर्वांचे मनापासून आभार.