वखत वेळ

वखत वेळ कुठला विसरती माणसे
बघत खेळ कसला गुंगती माणसे

तो जरी हारला, मी जरी जिंकलो
नाव त्याचेच का घोकती माणसे?

तीच ती भांडणे,त्याच त्या कारणे
बदलते शस्त्र, ना बदलती माणसे

आवई प्रलयाची उठविते कुणी
सावली सोडुनी धावती माणसे

दूर असता किती मखमली भासती
जवळ जाताच पण टोचती माणसे

लावती जीव जे सोडती साथ का?
माणसांनाच ना समजती माणसे

(जयन्ता५२)

गझल: 

प्रतिसाद

तो जरी जिंकला, मी जरी हारलो
नाव त्याचेच का घोकती माणसे?
व्वावा!
दूर असता किती मखमली भासती
जवळ जाताच पण टोचती माणसे
वा!  'बदलती  माणसेही ..'  वा! गझल आवडली.

आवई जगबुडीची उठविते कुणी असे केले तर एका मात्रेची उणीव भरून काढता येईल.

मस्त आहे गझल!! माणसांच्या छटा पकडल्या आहेत मार्मिकपणे.

वखत वेळ कुठला विसरती माणसे
बघत खेळ कसला गुंगती माणसे
इथे 'वखत' आणि 'वेळ' म्हणजे सारखेच ना?? मला वाटले 'वखत' तरी असावं किंवा 'वेळ' तरी असावं...पण दोन्ही???
शिवाय 'वखत वेळ' विसण्यापेक्षा
'वखत वेळ कुठला पाळती माणसे'
असे कसे वाटेल?
-आभाळ :)

 

आभाळ,

'वखतवेळ' हा वाकप्रचार(?) आहे. देशावर'वखत बांका' (दहशतवाद व इतर संकटे) आला आहे हे 'विसरून' माणसे भलतेच खेळ (बिग ब्रदर,शिल्पा शेट्टी -गीअर प्रकरण इ) बघण्यात गुंगली आहेत असे मला म्हणायचे आहे.'वखत वेळ कुठला पाळती माणसे' हे अभिप्रेत नाही.

जयन्ता५२

वा जयंतराव,
बर्‍याच दिवसांनी आपल्या ग़ज़लेचा आस्वाद घेतला. आवडली. वखत वेळ हा नवीन शब्द आमच्या संग्रही जमा झाला. धन्यवाद.
आपला,
(शब्दप्रेमी) धोंडोपंत
या संकेतस्थळावर येणे म्हणजे माहेरी आल्यासारखे वाटते. आपले अनेक जुने मैत्र येथे आहेत.
आपला,
(सांगाती) धोंडोपंत

 
 
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

हा शेर कृपया असा वाचावा!

तो जरी हारला, मी जरी जिंकलो
नाव त्याचेच का घोकती माणसे?
(प्रशासकः ही चूक मूळ गझलेत संपादन करून सुधारता येईल का?)
जयन्ता५२

जयंतराव,
गझल आवडली. अनेक शब्दप्रयोगही.. उदा. वखतवेळ.
नाव त्याचेच का घोकती माणसे? - वा! वा! वा!
- कुमार