प्रदेश...
............................
प्रदेश...
............................
द्यायचा किती स्वतःस त्रास आणखी ?
व्हायचे कसे, किती उदास आणखी ?
एवढ्यात थांबली कशी तुझी कथा ?
तू लिहायला हवेस खास आणखी !
शोधले तुझ्यात अन् स्वतःतही तुला...
मी तुझा करू किती तपास आणखी ?
ये अजून, ये अजून, ये, समीप ये...
अंतराय फक्त एक श्वास आणखी !
जीवना, शिकायचे अजून मी किती ?
लांबणार का उगाच तास आणखी ?
वागतो तुझ्यासवे नमून मी जसा...
वाढते तशी तुझी मिजास आणखी !
जायचे अजून मी पुढे पुढे किती ?
लागतो प्रदेश हा भकास आणखी !
- प्रदीप कुलकर्णी
गझल:
प्रतिसाद
कैलास
मंगळ, 27/07/2010 - 21:23
Permalink
वाहवा... नितांतसुंदर
वाहवा... नितांतसुंदर गझल......
शोधले तुझ्यात अन् स्वतःतही तुला...
मी तुझा करू किती तपास आणखी ?..............क्या बात है ...
ये अजून, ये अजून, ये, समीप ये...
अंतराय फक्त एक श्वास आणखी !....... ये अजुन्,ये अजुन..... हे लयीत म्हणण्याची एक वेगळीच मजा आहे.....
जीवना, शिकायचे अजून मी किती ?
लांबणार का उगाच तास आणखी ? .... बहुत बढिया...
हे तीन शेर खू.......................प आवडले.
डॉ.कैलास
बेफिकीर
बुध, 28/07/2010 - 00:03
Permalink
वा व्वा प्रदीपराव, तुमच्या या
वा व्वा प्रदीपराव,
तुमच्या या गझलेने या स्थळावर मला आणले खरे! खरोखर मस्त गझल! सर्व शेर आवडले.
देरसे आये.... दुरुस्त!
ये अजून, ये अजून, ये समीप ये - यावरून तुमचाच शेर आठवला...
ये समीप, घे हाती हात, बोल, तू काही..
दोन चार शब्दांनी मी मळायचो नाही...
व्वा!
-'बेफिकीर'!
अजय अनंत जोशी
बुध, 28/07/2010 - 08:11
Permalink
शोधले तुझ्यात अन् स्वतःतही
शोधले तुझ्यात अन् स्वतःतही तुला...
मी तुझा करू किती तपास आणखी ?
हा शेर आवडला.
चित्तरंजन भट
बुध, 28/07/2010 - 08:52
Permalink
शोधले तुझ्यात अन् स्वतःतही
शोधले तुझ्यात अन् स्वतःतही तुला...
मी तुझा करू किती तपास आणखी ?
वाव्वा..
जायचे अजून मी पुढे पुढे किती ?
लागतो प्रदेश हा भकास आणखी !
वाव्वा.
हे दोन शेर प्रतिसादापुरतेच वेगळे काढले आहेत. नेहमीप्रमाणे अख्खी गझल दमदार.
वैभव देशमुख
बुध, 28/07/2010 - 11:32
Permalink
शोधले तुझ्यात अन् स्वतःतही
शोधले तुझ्यात अन् स्वतःतही तुला...
मी तुझा करू किती तपास आणखी ?
वागतो तुझ्यासवे नमून मी जसा...
वाढते तशी तुझी मिजास आणखी !
वा ...
गझल आवडली
ह बा
बुध, 28/07/2010 - 11:53
Permalink
सगळी गझल खल्लास.... झकास झाली
सगळी गझल खल्लास.... झकास झाली आहे.
ज्ञानेश.
बुध, 28/07/2010 - 12:06
Permalink
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ! फार
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम !
फार सुंदर गझल आहे ! सगळेच्या सगळे शेर आवडले.
धन्यवाद, ही गझल वाचायला दिल्याबद्दल.
योगेश वैद्य
बुध, 28/07/2010 - 21:35
Permalink
वा! गझल छान. मतला काय सहज
वा!
गझल छान.
मतला काय सहज आलाय!
क्रान्ति
गुरु, 29/07/2010 - 15:23
Permalink
एवढ्यात थांबली कशी तुझी कथा
एवढ्यात थांबली कशी तुझी कथा ?
तू लिहायला हवेस खास आणखी !
वा! मस्त जमलीय गझल!
आनंदयात्री
गुरु, 29/07/2010 - 23:36
Permalink
ही गझल आपण आधी कुठे प्रकाशित
ही गझल आपण आधी कुठे प्रकाशित केलेली आहे का?
(मला ही/ह्यासारखी आधीही वाचल्यासारखी वाटते आहे... नसेल तर क्षमस्व.. माझा गोंधळ झाला असेल..)
गझल छान आहेच...
प्रदीप कुलकर्णी
शनि, 31/07/2010 - 14:11
Permalink
ही गझल आपण आधी कुठे प्रकाशित
ही गझल आपण आधी कुठे प्रकाशित केलेली आहे का?
- नाही. ज्या दिवशी मला ही गझल सुचली, त्याच दिवशी मी ती इथे सादर केलेली आहे. सादर करण्याआधी काही तासच आधी ही गझल मला सुचलेली आहे.
(मला ही/ह्यासारखी आधीही वाचल्यासारखी वाटते आहे...
- कुठे ? तुम्ही जिथे वाचली तिथल्या संकेतस्थळाची, ब्लॉग असल्यास ब्लॉगची वगैरे वगैरे लिंक द्यावी. लिंक देणे शक्य नसल्यास ती रचना इथे उतरवावी. म्हणजे नेमके काय झालेले असावे, हे मलाही कळेल.
या संकेतस्थळाशिवाय केवळ `मनोगत` याच संकेतस्थळावर मी माझ्या रचना (कविता आणि गझलाही ) सादर केलेल्या आहेत. दोन्हीकडे वेगवेगळ्या रचना सादर करण्याचे धोरण मी अगदी पहिल्यापासूनच अवलंबलेले आहे. या संकेतस्थळावर सादर केलेली रचना `मनोगत`वर आढळणार नाही आणि `मनोगत`वर सादर केलेली रचना इथे आढळणार नाही.
नसेल तर क्षमस्व..
- क्षमा कशासाठी ?
माझा गोंधळ झाला असेल..)
-कदाचित. तसेच झाले असेल. तुमचा गोंधळ दूर झाल्यावर तसेही लगेचच कळवावे. म्हणजे माझाही (आणि तुमच्याशिवाय इतरांचा झाला असल्यास त्यांचाही) गोंधळ दूर होईल.
गझल छान आहेच...
- धन्यवाद.
निलेश कालुवाला
बुध, 04/08/2010 - 22:39
Permalink
प्रदीपजी, ही गझल तर आवडलीच.पण
प्रदीपजी,
ही गझल तर आवडलीच.पण त्याहून या गझलेतील सहजता जास्त आवडली.
बहर
सोम, 09/08/2010 - 02:41
Permalink
अंतराय फक्त एक श्वास आणखी...
अंतराय फक्त एक श्वास आणखी... आहाहा! वा!
आनंदयात्री
सोम, 09/08/2010 - 22:38
Permalink
प्रदीपजी, नसती शंका घेतली असं
प्रदीपजी,
नसती शंका घेतली असं वाटू नये म्हणून क्षमस्व म्हटलं.. तुमच्या गझला खरंच quality असतात.. आम्ही कालचे गझलकार आहोत.. भावना शब्दांत नेमक्या उतरवणं आत्ता कुठे जमायला लागलंय (असं वाटतंय), गझलेच्या क्षेत्रात बराच पल्ला अजून बाकी आहे.. त्यामुळे माझ्या त्या post मुळे उगाच गैरसमज होऊ नयेत, म्हणून आधीच sorry म्हटलं..
सध्यातरी मला अशा प्रकारची रचना कुठे वाचली होती ते आठवलेलं नाहीये.. (पण उडालेला गोंधळ genuine होता.)
धन्यवाद!
कैलास गांधी
गुरु, 12/08/2010 - 16:57
Permalink
वागतो तुझ्यासवे नमून मी
वागतो तुझ्यासवे नमून मी जसा...
वाढते तशी तुझी मिजास आणखी !
गझल छानच झाली आहे... वरचा शेर जबरी...!!!