सत्ते तुझ्या चवीने

सत्ते तुझ्या चवीने

सत्ते तुझ्या चवीने नेते चळून गेले
कुरवाळती कुणाला, कोणा छळून गेले

सारे मिळून भेदू, हा व्यूह ते म्हणाले
लढतोय एकटाची, सारे पळून गेले

कित्येक चाळण्यांनी, स्वत्वास गाळले मी
उरलीय चित्तशुद्धी, हेवे गळून गेले

समजू नको मला तू विश्वासघातकी मी
पाऊल सरळ होते, रस्ते वळून गेले

आता इलाज नाही, नाहीत मलमपट्ट्या
मजला कळून आले, तुजला कळून गेले

वणव्यात कालच्या त्या, काही उडून गेले
काही बिळात घुसले, काही जळून गेले

का सांगतोस बाबा अभयास कर्मगाथा
द्रवलेत कोण येथे, कोण वितळून गेले?

गंगाधर मुटे
.................................................

गझल: 

प्रतिसाद

हा शेर कृपया असा वाचावा.

वणव्यात कालच्या त्या, काही उडून गेले
काही बिळात घुसले, बाकी जळून गेले

मतला आणि चाळणी... दोन्ही आवडले.... छान गझल.

डॉ.कैलास

कित्येक चाळण्यांनी, स्वत्वास गाळले मी
उरलीय चित्तशुद्धी, हेवे गळून गेले

हा शेर आणि गझल आवडली.

संपूर्ण गझल आवडली.पुढील दोन शेर छान आहेत.

कित्येक चाळण्यांनी, स्वत्वास गाळले मी
उरलीय चित्तशुद्धी, हेवे गळून गेले

समजू नको मला तू विश्वासघातकी मी
पाऊल सरळ होते, रस्ते वळून गेले

सारे मिळून भेदू, हा व्यूह ते म्हणाले
लढतोय एकटाची, सारे पळून गेले

हा शेरही खासच.

सुंदर मतला...
सत्ते तुझ्या चवीने नेते चळून गेले
कुरवाळती कुणाला, कोणा छळून गेले

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.