होतीस तू

माझिया प्रेमात राणी,गात होतीस तू
भारलेली ही सुगंधी, रात होतीस तू

वाट वेडी, दाट झाडी, साथ होतीस तू
स्पर्श होतो चोरटा, लाडात होतीस तू

पेटती विझले निखारे, आसवांनी जणू
ह्या मनाच्या सागरी खोलात होतीस तू

वाटते की नित्य, नेमाने रुसावेस तू
जीवघेण्या आर्जवी, नादात होतीस तू

बाभळीचे रान होते, पावलो पावली
वेदना ही लाघवी, पायात होतीस तू

ये! नको रागावु आता, श्वास माझाच तू
भान गेल्या पापण्यांना, ज्ञात होतीस तू

गझल: 

प्रतिसाद

अनंतजी प्रमाणे माझेहि म्हणणे आहे....... तंत्र पाळण्यात एकजीव झालो की नवनिर्मिती अथवा उत्स्फूर्तता जराशी कृत्रिम वाटू लागते.......

पहिल्या ओळीचा प्रभावि समारोप दुसर्‍या ओळीत व्हावा ही मूळ निकड आपल्या शेरात भागवली गेली नाही असे वाटते.

बाभळीचे रान होते, पावलो पावली
वेदना ही लाघवी, पायात होतीस तू

हा शेर छान जमलाय....

पुलेशु.

डॉ.कैलास

तंत्र पाळण्यात एकजीव झालो की नवनिर्मिती अथवा उत्स्फूर्तता जराशी कृत्रिम वाटू लागते.......
एकदम मान्य.
माझ्या यापुर्वीच्या गझलांना तांत्रिक मोजमापात मोजले गेले होते, शिस्तीचा अतिरेक मोकळेपणाला घातक ठरतो.
पण कवितेतुन गझलकडे यायचे म्हणजे वॉचमनला बी.एस.एफ. मध्ये पाठवण्यासारखे आहे.
असो.
असाच लोभ असावा.

धन्यवाद वामनजी
निश्चितच उमेद वाढेल.

रदीफ फार फार आवडली. 'होतीस तू' मधे एक भयानक वेदना आहे.

अभिनंदन!