सहज मनापर्यंत पोहोचलेले....

एखादा शेर किंवा गझल आवडण्यासाठी वाचणाऱ्याचं गतायुष्य, अनुभवविश्व, पूर्वग्रह, आकलनक्षमता, शब्दभांडार अशा अनेक चाळण्या पार कराव्या लागतात. अशा वेळी एखादा शेर पटकन मनाला भावतो. कारण माझ्या मते त्यात आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश असतो. मला या संकेतस्थळावरचे असे बरेच शेर / गझला आवडल्या आहेत. त्यापैकी काही वाचल्यानंतर मला जे वाटले ते मी इथं लिहितो आहे. समीक्षण / रसग्रहण असा कोणताही संदर्भ याला जोडू नये, ही विनंती.

(१)
त्या हातांची याद अताशा रोजच येते
ज्यांनी जगण्यालाच कधी पाखडले होते
-ज्ञानेश
प्रगती, नोकरी, व्यवसाय, संसार, स्वप्नं ...आयुष्याच्या गोलाकार मैदानावर आपण सरळ रेषेत धावून यश गाठण्याचा प्रयत्न करत राहतो आणि फिरून फिरून पुन्हा आपल्याच मुळांपाशी येऊन पोहोचतो... एक वेळ अशी येते की, सुखामागे उभा असणार्‍या मूर्खांच्या रांगेत आपणही एक आहोत ही जाणीव होते. सरसकट ओरबाडण्याची आपलीच वृत्ती आपल्याला सलू लागते आणि कुणीतरी कधीतरी आपल्या चोखंदळ हातांनी स्वार्थाचे खडे नसणारं, कपटाचा कचरा नसणारं, स्वच्छ, पाखडलेलं आयुष्य आपल्याला दिलेलं असतं, याची आठवण येते... कधी ती आजी असते, कधी आई...

(२)
विचार करता करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे शब्द निरक्षर झाले
-चित्तरंजन भट
या शेरातील कल्पनांनी मला अगदी सहज प्रभावित केलं. 'लख्ख देखणा प्रकाश फुटला' हे वाचताना अंगावरचे साखळदंड तुटल्यासारखा फील येतो. सगळे गुन्हे माफ... सगळ्या शंका सरल्या... ज्या शब्दांनी मला जखडून ठेवलेलं... आपल्या शहाणपणानं मला मूर्ख ठरवलेलं , तेच या सत्याच्या प्रकाशात उघडे पडले..... त्यांचा फोलपणा समोर आला. एक अप्रतिम शेर!

(३)
आज निसरड्या संध्येवरुनी पाय घसरला कोणाचा?
आज कुणाचा उजेड गेला अंधाराच्या आहारी
-वैभव जोशी
निसरडी संध्या, 'कुणाचा उजेड' या शब्दांनी या शेराला आशयाची जी श्रीमंती दिली आहे, ती निव्वळ अप्रतिम आहे. अनेक संध्यासमयी स्वतःला आठवांच्या शेवाळापासून वाचवावं आणि आपल्याही नकळत एखादी सायंकाळ आपल्याला बेचैनीच्या काठावरून अश्रूंच्या प्रवाहात घेउन जावी. या शेरावर मी दहा मिनिटांचं भाषण करू शकतो. पण मी समीक्षक नाही. खूप खूप खूप खूप आवडलेला शेर.

(४)
तसाच धुरळा, तशाच वाटा, तशीच चिंता, गावी बाकी...
जिथून पक्का भरून पाया, शहर नव्याने वसले आहे.
-सोनाली जोशी
(५)
पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते दिवेलागणीच्या वेळी!
-प्रदीप कुलकर्णी

वरील दोन्ही शेर हे माझ्या मनात, जगण्यात, लिहिण्यात नेहमी असणार्‍या विषयांचेच आहेत. माझ्यासह बरंच काही बदललं आहे... फक्त गाव अजूनही तसाच आहे.
`कुणी पोर डोळे भरते...` हे तर गावातून बाहेर पडताना कायमच घडतं. दोन्ही शेर फक्त आशयामुळेच नव्हे; तर रचना म्हणूनही उत्तम आहेत.

(६)
धनिक सारे रूपसुंदर देखणे!
काय घेतो लाच आहे आरसा?
-जयन्ता५२
हाच प्रश्न माझाही आहे. धनिकांनी उकल करावी.

मी एकूण ५७ शेर निवडून ठेवलेले आहेत; पण ही टायपिंगची भानगड भलतीच अवघड वाटते आहे. असो. इतर शेर नंतर देईन. धन्यवाद!

प्रतिसाद

आपण चांगला धागा सुरु केलात हबा.....

मला भेटायला आले,मला भेटुन जाताना
मला भेटायचे नाही,असे ठरवून गेलेले....

हा शेर मला खू........प आवडतो....
आपल्याविषयी गैरसमज असलेल्या कित्येकांच्या डोळ्यांत... गैर्समज दूर झाल्यानंतर मी हाच शेर वाचलाय...

मला उर्दूतील एक शेर नेहमीच आठवतो...... परवा '' तिरुपति मंदिरात प्रवेशाकरिता ड्रेस कोड असणार '' या बातमी नंतर तो प्रकर्षाने आठवला....

जाहिद शराब पीने दे मस्जिद मे बैठकर
या वो जगह बता दे जहाँपर खुदा न हो
.......

असो !! या निमित्ताने एक चांगला धागा सुरु झाला.

धन्यवाद हबा.

डॉ.कैलास

मला भेटायला आले,मला भेटुन जाताना
मला भेटायचे नाही,असे ठरवून गेलेले....

जाहिद शराब पीने दे मस्जिद मे बैठकर
या वो जगह बता दे जहाँपर खुदा न हो .......

कैलासजी,
बोहोत अच्च्छा लगा. दोनो लाजवाब है.

आपल्या ५७ शेरांपैकी फक्त ६ द्रुग्गोचर झाले आहेत...... येउ द्या पुढचे.

डॉ.कैलास

वेळेनुसार सर्व शेर देणारच आहे. मला ते द्यायचेच आहेत. (क्रुपया द्रुग्गोचर या शब्दाची फोड करा. अर्थही सांगा.)

दृग्गोचर = दृष्टी + गोचर
म्हणजे दृष्टीपथास पडणे.

डॉ.कैलास

हबा..... हा धागा मृतवत झाला...? आपणांस पुढचे शेर देण्याची आठवण या निमित्ताने करुन द्यावीशी वाटली.

डॉ.कैलास

कैलासजी लवकरच....