रहस्ये गाडली गेली तळाशी

रहस्ये गाडली गेली तळाशी..

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..

*कुठे टिंबे, रिकामी ओळ होती...
कसे हे जोडले नाते तुझ्याशी?

किती लहरी तुझ्या सांभाळल्या मी
(चकित होवून बघती ते खलाशी!)

शिळोप्याच्या सुरू गप्पा कधीच्या
बिचारे पोट बसलेले उपाशी

तिथे ढीगभर कंटाळा असावा..
म्हणूनच झोपलेली सुस्त माशी

व्यथा हासून सांगे ’,ये जरा तू
मला कवटाळ कायमचे उराशी’

म्हणे हे जवळ आले जग ! ...तरी पण..
मिळे बाई कुठे गंगा नि काशी !

* हा असा/ अशाप्रकारची भावना असलेला शेर वाचनात आला आहे असे राहून राहून वाटते आहे. कुणाचा ते आठवत नाही. क्षमस्व.

गझल: 

प्रतिसाद

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..
वा वा!
मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..
खरे आहे. छान.

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..

जबरदस्त !

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..

सुं द र !

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..

जबरदस्त शेर ! प्रत्येक भारतीय स्त्रीचा शेर !
खूप आवडला.

किती लहरी तुझ्या सांभाळल्या मी
(चकित होवून बघती ते खलाशी!)

इथे 'लहरी' चा श्लेष खूप आवडला.

छान आहे गझल.
पुलेशु.

गझल आवडली. ढीगभरमधे बहुधा 'ढि' करावे लागेल. माशी हा शेर नेमका लक्षात आला नाही. मतला व वचकून हे शेर खूपच आवडले.

धन्यवाद!

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..
व्वा, मस्त.

किती लहरी तुझ्या सांभाळल्या मी
(चकित होवून बघती ते खलाशी!)

चांगला शेर आहे.

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..

वाव्वा!! असे शेर मराठी गझलेत येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पहिले तिन्ही शेर विशेष आवडले.

गझलेत मनस्विता येणं हे सुद्धा सौंदर्य आणण्याचं साधन असू शकतं. ( वैयक्तिक मत!) तुमच्या गझलेत ती मनस्विता आहे. चित्तरंजन म्हणाले त्याप्रमाणे नव्या धाटणीचे आणि नव्या दाखल्यांचे शेर तुमच्या निमीत्ताने येत आहेत हे खूप छान आहे.मनापासून शुभेच्छा!

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..

आवडलेत.

अप्रतिम गझल.

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..
सुरेख.

ह्यावरुन सहज, गुलजारसाहेबांनी एक 'त्रिवेणी' म्हणुन रुबायी प्रमाणे प्रकार प्रकाशित केला होता त्यातील एक त्रिवेणी आठवली.
कदाचित शब्द मागेपुढे होतील,
बिछान्यावरुन ओढावी चादर तशी वाहणारी नदी
तळाशी झोपलेल्या कुणाला शोधत आहे ती
...........पाण्यात बुडलेल्यांना झोपूही देत नाहीत सुखाने.

सुन्दर

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..
सु॑दर गझल...

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..
या शेराबाबत - अजय, ज्ञानेश व चित्तरंजन यांच्याशी सहमत, सुंदर शेर

व्यथा हासून सांगे ’,ये जरा तू
मला कवटाळ कायमचे उराशी’

सुरेख.

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..
सु॑दर गझल..