नव्हतो

मी कधीही पेटलेली आग नव्हतो
मी कधीही बहरलेली बाग नव्हतो

भूक होती, झोप होती, श्वास होते
मीच देहाचा कधीही भाग नव्हतो

कोण होतो ते मला कळलेच नाही
कमळ नव्हतो, फणस नव्हतो, साग नव्हतो

माळरानी छेडलेली शीळ होतो
मैफलीमधला कधी मी राग नव्हतो

लागला माझा कसा तुजला सुगावा?
ठेवुनी जावा असा मी माग नव्हतो

नचिकेत जोशी

गझल: 

प्रतिसाद

भाग आणि माग फारच आवडले.

मतल्यातील दोन ओळींचा एकमेकांशी (असलेला) संबंध समजला नाही.

साग आणि माग हे 'बेफिकीर' स्टाईल (म्हणजे यमकानुसारीत्वाप्रमाणे रचलेले) शेर वाटले. तरीही माग आवडण्यासारखा.

गझल आवडली. माग, भाग विशेष. माग फार आवडला.

भावलेले शेर :

माळरानी छेडलेली शीळ होतो
मैफलीमधला कधी मी राग नव्हतो

लागला माझा कसा तुजला सुगावा?
ठेवुनी जावा असा मी माग नव्हतो

गझल उत्तम!

ओघवती सहज गझल्....आवडली!

बेफिकिर, चित्तजी, ह.बा, मधुघट - मनापासून धन्यवाद!
बेफिकिर,
पेटलेली आग आणि बहरलेली बाग ही फक्त वर्णनात्मक विशेषणे आणि जमीन establish करण्यासाठी घेतलेले शब्द आहेत.
त्यांचा एकमेकांशी संबंध मला तरी लावता आला नाही...
अर्थात, शेर म्हणून तो मला योग्य वाटतो...
धन्यवाद!!

मस्त... भाग आणि माग मला पण आवडले...

भूषणजी : मतल्यात दोन्ही ओळीत काही संबंध नसला तरी मी कधीही कुठलीच टोकाची गोष्ट नव्हतो (पेटलेली आग व्वा बहरलेली बाग) असा अर्थ मी घेतला... अर्थात तो अजून चांगल्याप्रकारे मांडता आला असता असे वाटते

भूक होती, झोप होती, श्वास होते
ही ओळ छान.
लागला माझा कसा तुजला सुगावा?
ठेवुनी जावा असा मी माग नव्हतो
वा!

धन्यवाद मिलिंद व नचिकेत,

बरोबर! जरी दोन्ही वेगळी वर्णने असली तरी त्यातून एक 'मी कधीच कोणत्याच टोकाचा नव्हतो' हा संदेश जरूर समजत आहे विचार केल्यावर!