तू कधी ही न रागावली पाहिजे

तू कधी ही न रागावली पाहिजे

तू कधी ही न रागावली पाहिजे
हे मला पावलो पावली पाहिजे

मी भले राहिलो ऊष्ण ऊन्हामध्ये
तुजवरी हरघडी सावली पाहिजे

मी कुणा आवडो,नावडो मी कुणा
मात्र सर्वांस तू भावली पाहिजे

चक्र पायात मी घेवुनी हिंडतो
तू कुठे ना कधी धावली पाहिजे

आज ''कैलास'' आहेस निर्धास्त तू
तुजसवे ती न धास्तावली पाहिजे

डॉ.कैलास

गझल: 

प्रतिसाद

आज ''कैलास'' आहेस निर्धास्त तू
तुजसवे ती न धास्तावली पाहिजे

अप्रतिम!!!

माझ्यामते आणखी थोडी सफाई आणता येईल.
१.
मी कुणा आवडो,नावडो मी कुणा
मात्र सर्वांस तू भावली पाहिजे

ह्या शेरातल्या वरच्या ओळीत २ दा मी आले आहे ते टाळता येईल. किंवा त्यातही सिमेट्री आणता येईल.
मी कुणा आवडो, मी कुणा नावडो
मी कुणा आवडो वा कुणा नावडो

असे काहीसे

२. ह्याशिवाय ऊष्ण ऊन्हामध्ये खटकते.

३. मतल्यातली खालची ओळ वर, वरची ओळ खाली केल्यास अधिक प्रभावी वाटेल काय?

असो. चूभूद्याघ्या. बाकी गझल ठीक झाली आहे. भावली विशेष भावला. आणि मतलाही छान.

@ ह.बा.

धन्यवाद

@ चित्तरंजनजी

मी कुणा आवडो,वा कुणा नावडो..... हे अगदी चपखल आहे... .. धन्यवाद.

ऊन्हाचा शेर असा वाचावा.... ( ऊष्ण ऊन्हामधे.. लयीत म्हणता येत नाही )

मी जरी साहतो , ऊन ग्रीष्मातले
तुजवरी हरघडी सावली पाहिजे

मतल्याबद्दलही आपल्या मताशी सहमत.

धन्यवाद.

डॉ.कैलास

चित्तजींनी सांगितले आहेच सुधारणांबद्दल...
फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या.....रागावली, धावली अन भावलीच्या पुढे पाहिजे असे आवश्यक आहे.

नोटेड मधुघटजी,...

धन्यवाद

डॉ.कैलास

रागावली, धावली अन भावलीच्या पुढे पाहिजेस असे आवश्यक आहे.

आवश्यक आहे असे वाटत नाही. आल्यास बरे. पण इथे अन्त्ययमकात आता सुधारणेला वाव नाही.

द्वितिय पुरुषी सर्वनाम घेतल्याने मधुघट म्हणतात त्याप्रमाणे पहिजेस असे असायल हवे....अर्थात रदीफ आता बदलता येणर नाही... त्या ऐवजी सर्वनाम बदलावे लागेल....

म्हणजे आपण म्हणता ते शेर असे लिहावे लागतील.

ती कधी ही न रागावली पाहिजे
हे मला पावलो पावली पाहिजे

मी कुणा आवडो,वा कुणा नावडो
मात्र सर्वांस ती भावली पाहिजे

चक्र पायात मी घेवुनी हिंडतो
ती कुठे ना कधी धावली पाहिजे

डॉ.कैलास

ह्म्म ती घेतली की जो एक संवादाचा फील येतो तो जातो असे वाटते..
आणि शेवट पाहिजे(स) नसेल तर असे प्रत्येक शेरात झाल्याने वाचायला खटकते...

बाकी चित्त साहेबांनी सुचना केल्या आहेतच...

म्हणजे गझल फसलीच म्हणायची... असो.

आपले मार्गदर्शन अन प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

डॉ.कैलास

असेच काही नाही... लिहित रहा लिहून लिहून सुधारणा होतेच...

एक सुचवणी : रचना वाचकांपर्यंत पोचवायची घाई करू नका... तुम्हाला स्वतःला त्यात अजून काय सुधारणा जमतेय ह्यावर विचार करा... हे माझे वैयक्तिक मत अर्थात

पुलेशु

खरे आहे मिलिंदजी,

अगदी रॉ स्वरुपात अस्तानाच मला रचना प्रकाशनाची घाई होतेय....
आपल्या सूचनेबद्दल पुनश्च आभार.

डॉ.कैलास

ठीक.

धन्यवाद अजय जी

डॉ.कैलास