पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना

काठभरल्या घागरीतुन गाळलेल्या वेदना
नाचल्या माहेरभर सांभाळलेल्या वेदना

पीठ आहे अडकुनी जात्यात आरीभर जरी
पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना

तीच ती भांडी घरी आहेत तुटकी आजही
वाहिल्या कृष्णेत पण खंगाळलेल्या वेदना

मंदिराच्या पायरीवर काल त्याला पाहिले
का बरे मी टाळल्या कुरवाळलेल्या वेदना

प्रेमदात्या पाढरीची काय ही जादूगरी
कोंभ हिरवा प्रसवती भेगाळलेल्या वेदना

गझल: 

प्रतिसाद

काठभरल्या घागरीतुन गाळलेल्या वेदना
नाचल्या माहेरभर सांभाळलेल्या वेदना

सुंदर ! ग्रामिण टच् ---प्रशांत

शेवटचा शेर

प्रेमदात्या पांढरीची काय ही जादूगरी
कोंभ हिरवा प्रसवती भेगाळलेल्या वेदना

असा वाचावा.

प्रशांतजी धन्यवाद!

खुपच छान हो!
नाचल्या माहेरभर सांभाळलेल्या वेदना

ही ओळ कुणाही स्त्रीच्या डोळ्यात पाणी आणायला पुरेशी आहे.

प्रेमदात्या पांढरीची काय ही जादूगरी
कोंभ हिरवा प्रसवती भेगाळलेल्या वेदना..
खुप उंचीवरचा शेर .

..पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना

वाह!

धन्यवाद मनीषाजी!
गझलेचे व्रुत्त कसे ओळखावे कुणी सांगेल का?

गझलेचे व्रुत्त कसे ओळखावे/सर्व व्रुत्तांची माहिती कुठे मिळेल कुणी सांगेल का?

ह बा...

हे घ्या..

http://www.sureshbhat.in/node/1704

डॉ.कैलास

कैलासजी
अनंत धन्यवाद!

नाचल्या माहेरभर सांभाळलेल्या वेदना, आणि पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना - फार फार आवडले!!

वा वा !
नाचल्या माहेरभर आणि पाखरे खाऊन गेली हे दोन्ही अतिशय आवडले.

मतला आणि पाखरे छान.

वृत्ताबद्दल,
मला वाटते वृत्त ओळखणे हा प्रकार जरा विनोदीच आहे. कारण, ओळखू न आलेले वृत्त कदाचित नियमबाह्य ठरू शकेल...:)

वृत्ताबद्दल,
मला वाटते वृत्त ओळखणे हा प्रकार जरा विनोदीच आहे. कारण, ओळखू न आलेले वृत्त कदाचित नियमबाह्य ठरू शकेल...:)

या प्रश्नाचे योग्य उत्तर मला आधीच मिळालेलं आहे. तरीही आपण पुन्हा एकदा, वेगळ्या माहितीसह हे उत्तर दील्याबद्दल आभारी आहे.

राम क्रुष्ण हरी!!!

वा! सुरेख!

छान गझल....

काठभरल्या घागरीतुन गाळलेल्या वेदना
नाचल्या माहेरभर सांभाळलेल्या वेदना

सुंदर गझल...
तुमच्या गझलांना उत्तरोत्तर लोकप्रियतेची झळाळी येत जावो...
शुभेच्छा..

मंदिराच्या पायरीवर काल त्याला पाहिले
का बरे मी टाळल्या कुरवाळलेल्या वेदना

१ नंबर

मला ही रचना अजिबात समजली नाही. हा माझा दोष असावा. वेदना हे अंत्ययमक नावीन्यपूर्ण आहे व वृत्तहाताळणी आवडली.

रचनेचा अर्थ समजल्यास आभारी राहीन.

वाहिल्या कृष्णेत पण खंगाळलेल्या वेदना
कृष्णामाई गझलेत आलेली पाहून फार बरे वाटले. कराडला माझे शिक्षण झाले असल्यामुळेही असेल. प्रीतिसंगमही यायला हरकत नाही. एकंदर गझल छान झाली आहे.

अवांतर:
गझलेत कुठल्या कुठल्या कविता आल्या आहेत हे बघणे रंजक ठरेल.
जिथे गेलो तिथे माझी नद्यांनी कौतुके केली
कुठे इंद्रायणी होती कुठे गोदावरी होती

हा शेर लगेच आठवला.

मनाला झालेल्या वेदना संथ वाहणार्‍या क्रुष्णेला सांगाव्यात आणि नदीवरून घागर भरून येताना हिंदोळ्यांनी सांडणार्‍या पाण्याने पायाखालची माती शितल करावी. जात्यावर दळताना भाऊरायाच्या यशाचे गोडवे गायले . पण काही सलणार्‍या आठवणी मात्र जोंधळे चाळल्यावर निघणारा कचरा पाखरांनी खाऊन जावा तश्या काळाच्या चोचीत बंद झाल्या......

बेफिकीरजी,
सांगत बसलो तर आपल्या दोघांनाही वेळ अपुरा पडेल. एक सोपा मार्ग सांगतो. गावाकडचं माहेर असलेल्या कुणाही 'आईला' विचारा. एक न संपणारी कथा सुरू होइल.

ढवळेंचा एक शेर आहे.

अवघे पैठण मागे मागे

मलाही एकदा एक द्विपदी जमली होती.

चोरट्या प्रेमास वळसा घालुनी जाते मुठा
सभ्य काठाबाजुनी लाजून वसलेले पुणे

धन्यवाद!

चित्तरंजनजी
*वाहिल्या कृष्णेत पण खंगाळलेल्या वेदना

कृष्णामाई गझलेत आलेली पाहून फार बरे वाटले. कराडला माझे शिक्षण झाले असल्यामुळेही असेल.*

वाचून खूप खूप खूप खूप खूप खूप आनंद झाला.

मी कराडचाच आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

हबा,
विचार, कल्पना चांगले आहेत माझ्यामते. अजून काही गोष्टी आल्यास उत्तम होईल.
सुरुवात आहे. असू दे...

शुभेच्छा आपल्याला.

सर्वांचे आभार.

या गझलेने दीलेला अनुभवः

बेफिकीर [27 मे 2010]
मला ही रचना अजिबात समजली नाही. हा माझा दोष असावा. वेदना हे अंत्ययमक नावीन्यपूर्ण आहे व वृत्तहाताळणी आवडली.
रचनेचा अर्थ समजल्यास आभारी राहीन.
बेफिकीरजीना अंत्ययमकाचे नाविन्य आणि व्रुत्तहाताळणी आवड ली पण आशय/ विचार कळाला नाही

तर

प्रणव.प्रि.प्र जीना आशय भावला.
प्रणव.प्रि.प्र जी त्याच दिवशी म्हणतात
हबा,
विचार, कल्पना चांगले आहेत माझ्यामते. अजून काही गोष्टी आल्यास उत्तम होईल.
सुरुवात आहे. असू दे...
शुभेच्छा आपल्याला.

बोध :- स्पष्टीकरण देत बसणे गरजेचे नाही.