मी तुला अन तू मला मिरवायला हवे

सत्य आयुष्या अता पचवायला हवे
सख्य माझ्याशी तुला जमवायला हवे

ऊठ आता जाग तू निद्रिस्त भारता
स्वप्न मरणासन्न हे जगवायला हवे

चांदण्यांचे दागिने मोडीत काढुनी
मी तुला अन तू मला मिरवायला हवे

सांग का आहे पुरेसे भिंत पाडणे?
आपल्यामधले चिरे बुजवायला हवे

हे कसे कोठार?... होते सारखे रिते
खाद्य मेंदूला नवे पुरवायला हवे

भंगला एकांत... जमले केवढे बघे
आपले भांडण मना मिटवायला हवे

ह्या व्यथेने त्या व्यथेशी नाळ जोडली
सूत दोघींशी मला जुळवायला हवे

पेरले आहेत मी पैसे चहूकडे
पीक सौख्याचे अता उगवायला हवे

वेळ नाही चेहरा वाचायला तुला
कंप्युटरला लाजणे शिकवायला हवे

गझल: 

प्रतिसाद

पेरले आहेत मी पैसे चहूकडे
पीक सौख्याचे अता उगवायला हवे

वेळ नाही चेहरा वाचायला तुला
कंप्युटरला लाजणे शिकवायला हवे
आवडले.

पेरले आहेत मी पैसे चहूकडे
पीक सौख्याचे अता उगवायला हवे

फार चांगली द्विपदी. आवडली. एकंदर छान.

पेरले आहेत मी पैसे चहूकडे
पीक सौख्याचे अता उगवायला हवे
वा! हा शेर सर्वात जास्त आवडला.
सोनाली

काही सुट्या सुट्या ओळी आवडल्या.
पीक सौख्याचे... वगैरे आवडले.
पण फार मजा नाही आली यावेळी. क्षमस्व.

वेळ नाही चेहरा वाचायला तुला
कंप्युटरला लाजणे शिकवायला हवे

छान कल्पना आहे ही!!!

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ..

पण फार मजा नाही आली यावेळी. क्षमस्व. >> पुढच्यावेळी अजून चांगला प्रयत्न करेन