मी जसा आहे तसा..
वासनांना अंत नाही पण मनाला खंत नाही-
बेरडे वैराग्य येण्या कोरडा मी संत नाही..
मी जसा बाहेरुनी आहे तसा आतूनही मी..
तोतया पोशाख घेण्याएवढा श्रीमंत नाही!
जे मनाला वाटते, पटते तसे बोलून टाके,
अक्षरे तोलावया मी थोर प्रज्ञावंत नाही!
मुक्तछंदाचा कवी मी शब्द शब्दा जोडणारा,
उमलती आर्या रचाया पात्र, मोरोपंत नाही
ते बघा कवितेकडे या नासिका मुरडून गेले..
का? म्हणे- 'रचनेत या दिसला कुठेच वसंत नाही!'
का इथे हे गीत मरणाचे तुझे गातोस वेड्या!
मी तुझ्या श्राद्धास येण्या जातिचा किरवंत नाही!
गझल:
प्रतिसाद
कैलास
मंगळ, 27/04/2010 - 13:04
Permalink
व्वा.... क्या बात है
व्वा.... क्या बात है ॠत्विक....... मस्तच झालिये गझल.
पुलेशु
डॉ.कैलास
बेफिकीर
मंगळ, 27/04/2010 - 17:15
Permalink
भावना स्पष्टपणे पोचल्या.
भावना स्पष्टपणे पोचल्या. सच्चाई का काय म्हणतात ते हेच असावे. पण एकंदर टीकात्मक अन एकच आशय सुचवू पाहणारे दोन, तीन शेर असलेली रचना वाटली.
स्वतंत्ररीत्या खालील शेर व ओळी आवडल्या.
वासनांना अंत नाही पण मनाला खंत नाही-
मी जसा बाहेरुनी आहे तसा आतूनही मी..
तोतया पोशाख घेण्याएवढा श्रीमंत नाही!
अक्षरे तोलावया मी थोर प्रज्ञावंत नाही!
ते बघा कवितेकडे या नासिका मुरडून गेले..
का इथे हे गीत मरणाचे तुझे गातोस वेड्या!
परंतु एकंदर परिणाम 'वैतागातून जन्माला आलेली टीकात्मक रचना' असा होत आहे मनावर!
मात्र (मुक्तछंद सोडल्यास ) मला सर्व मुद्दे आवडले.
क्षमस्व व शुभेच्छा!
ऋत्विक फाटक
बुध, 28/04/2010 - 15:23
Permalink
कैलासराव व बेफिकीर,
कैलासराव व बेफिकीर, धन्यवाद!
दुसर्या व तिसर्या शेराचा विषय व आशय थोडासा सारखाच झालाय..
सुधारणा सुचल्यावर नक्की बदल करीन.
एकंदर परिणाम 'वैतागातून जन्माला आलेली टीकात्मक रचना' असा होत आहे
याबाबत इतरांची मते जाणून घ्यायला आवडेल, कारण कविता करताना मी वैतागलेला वगैरे नव्हतो.
टीकात्मक' हा शब्द आपण वैतागाच्या संदर्भात, नकारात्मक अर्थाने वापरला आहे असे वाटते...
तर तशी टीका करण्याचाही माझा उद्देश नव्हता... उलट स्वतःतले दुर्गुण माहित असूनही एक प्रकारची बेफिकीर वृत्ती असलेल्या व्यक्तीचे ते म्हणणे आहे.
यानिमित्ताने मला असेही मत मांडावेसे वाटते की एखादी कविता ही त्या कवीचेच मनोगत असते नाही..
जसा एखादा हेरकथा लिहिणारा लेखक साधा कारकून असू शकतो त्याप्रमाणेच एखादा कवीही दुसर्याच्या दृष्टीकोनातून कविता लिहू शकतो.. किंबहुना तो तेव्हा स्वतःच्या मनाची एक बाजू मांडत असतो.
याविषयी आपल्या मतांची वाट पाहत आहे..
-ऋत्विक
अजय अनंत जोशी
शुक्र, 30/04/2010 - 19:52
Permalink
ऋत्विक, पहिले दोन शेर
ऋत्विक,
पहिले दोन शेर आवडले.
एकंदर परिणाम 'वैतागातून जन्माला आलेली टीकात्मक रचना' असा होत आहे
याबाबत इतरांची मते जाणून घ्यायला आवडेल
असे तुम्ही लिहिल्यामुळे मी यावर लिहीत आहे. मला तरी या गझलेबाबत असे वाटत नाही. अर्थात, तुम्ही लिहिले आहेतच. मला ही गझल फक्त टीकात्मक वाटत नाही. तसेच, 'वैतागातून जन्माला आलेली..' असा याचा परिणाम निदान मला तरी जाणवला नाही. कारण, अशा अनेक रचना इथे वाखाणल्या गेल्या आहेत.
यानिमित्ताने मला असेही मत मांडावेसे वाटते की एखादी कविता ही त्या कवीचेच मनोगत असते नाही..
हे तुमचे म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे. वास्तविक मी स्वतः ते अनेकवेळा जाहीरपणे मंचावरून मांडलेही आहे.
धन्यवाद.
गंगाधर मुटे
शुक्र, 30/04/2010 - 22:46
Permalink
छान गझल..!! एखादी कविता ही
छान गझल..!!
एखादी कविता ही त्या कवीचेच मनोगत असते नाही.
कुठलीही कविता, त्या कवितेत जो नायक/नायीका असते, त्या नायकाचे मनोगत असते, कविचे नाही. असे माझे मत.
एखाद्यावेळी कविला न पटणारी विचारधाराही कवितेत प्रतिबिंबित होऊ शकते. ते कविचे मत असतेच असेही नाही.
आनंदयात्री
शनि, 01/05/2010 - 22:02
Permalink
वसंत आवडला...
वसंत आवडला...
पुलस्ति
सोम, 03/05/2010 - 22:27
Permalink
प्रज्ञावंत शेर आवडला.
प्रज्ञावंत शेर आवडला.
ऋत्विक फाटक
मंगळ, 04/05/2010 - 13:27
Permalink
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!
मिल्या
सोम, 31/05/2010 - 18:11
Permalink
प्रज्ञावंत ... श्रीमंत >>
प्रज्ञावंत ... श्रीमंत >> आवडले
वासनांना अंत नाही पण मनाला खंत नाही- >> ही ओळ पण मस्त
ह बा
मंगळ, 01/06/2010 - 10:19
Permalink
वासनांना अंत नाही पण मनाला
वासनांना अंत नाही पण मनाला खंत नाही-
बेरडे वैराग्य येण्या कोरडा मी संत नाही..
उत्क्रुष्ट!!!