वजाबाक्या
हरवलेल्या सावल्यांना शोधतो
मी पुन्हा जखमा जुन्या त्या मागतो
आठवांच्या आज ही आल्या सरी
कोण डोळ्यातून माझ्या वाहतो?
ह्या दिशा दाही मला बोलावती
मी परी देहात माझ्या गुंततो
खेळ प्रेमाचा जरासा वेगळा
जिंकण्या साठी स्वतःला हारतो
चांदण्याशी काय बोलू रोज मी?
मग कशासाठी असा मी जागतो
ही कशी हातास मेंदी लावली?
डाग रक्ताचा कुणाच्या वाटतो!
झोपलो नाही कधीचा शांत मी
हाक मज आतून कोणी मारतो
ह्या वजाबाक्याच ह्या ना बेरजा
श्वासश्वासांना जरी मी जोडतो
-विश्वास
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 14/05/2007 - 16:51
Permalink
चांगली, सफाईदार
खेळ प्रेमाचा जरासा वेगळा
जिंकण्या साठी स्वतःला हारतो
वा! नेहमीची कल्पना पण सफाईदार लहजा.
ही कशी हातास मेंदी लावली?
डाग रक्ताचा कुणाच्या वाटतो!
वा! भरपूर दाद घेईल.
झोपलो नाही कधीचा शांत मी
हाक मज आतून कोणी मारतो!
वा!
गझल चांगलीच आहे. इतर सगळे शेरही सफाईदार आणि छानच आहेत. फार आवडली. पुढच्या गझलीला शुभेच्छा!
प्रदीप कुलकर्णी
सोम, 14/05/2007 - 17:46
Permalink
छान....
ह्या दिशा दाही मला बोलावती
मी परी देहात माझ्या गुंततो
अप्रतिम....वेगळी कल्पना
चांदण्याशी काय बोलू रोज मी?
मग कश्या (शा) साठी असा मी जागतो
छानच...
झोपलो नाही कधीचा शांत मी
हाक मज आतून कोणी मारतो
वा...वा !
ह्या वजाबाक्याच ह्या ना बेरजा
श्वासश्वासांना जरी मी जोडतो
सुंदर कल्पाना
वरील चारही शेर खूप आवडले...वेगळे काहीतरी वाचल्याचा आनंद मिळाला. येऊ द्या पुढची गझल लवकरच...!
नितीन
सोम, 14/05/2007 - 18:54
Permalink
अतिशय सुंदर...
अतिशय सुंदर... व्वा!
आभाळ
मंगळ, 15/05/2007 - 08:23
Permalink
श्वासश्वासांना ...
ह्या वजाबाक्याच ह्या ना बेरजा
श्वासश्वासांना जरी मी जोडतो
वा!अप्रतिम मक्ता... मेंदीही उत्कृष्ट!!
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 15/05/2007 - 10:41
Permalink
शेवटचा शेर विशेष भावला
क्या बात है!
पुलस्ति
बुध, 16/05/2007 - 21:04
Permalink
क्या बात है!!
सर्वच शेर आवडले!! वजाबाक्या तर केवळ अप्रतिम!!
-- पुलस्ति.