कंटाळा यावा इतका उत्साह कुणाला आहे?

कंटाळा यावा इतका उत्साह कुणाला आहे?
कंटाळ्याचाही आता कंटाळा आला आहे

ही लाजत लाजत हसते ती केस विंचरत बघते
प्रत्येक कुटुंबाचा मी अर्धा घरवाला आहे

मृत्यूचा खमंग दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच मसाला आहे

रस्त्यावर अस्तित्वाला मी कडेकडेने नेतो
हा पुढे निघाला आहे तो पुढे निघाला आहे

बघ मदिरा खराब आहे हे सांगण्यास आला हा
ही गोष्ट वेगळी आहे की नशेत आला आहे

हा कविकट्ट्यावर 'गेला' तो कविकट्ट्यावर 'गेला'
गेलोही असतो मीही पण वेळ कुणाला आहे

ठरवाच 'सभी' कुलकर्णी की कुठे बघावे आता
इकडे मधुबाला आहे तिकडे मधुशाला आहे

लाचार धोरणे तुमची गोत्यात आणती तुम्हा
माझ्याशी वैर धरे तो मासाच बुडाला आहे

ती चामर वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच कळाला आहे

होकारार्थी हलणार्‍या लोकांच्या माना सार्‍या
एकाला समजत नाही हा काय म्हणाला आहे

या दोनच प्रश्नांवरती मी जन्म खर्चले लाखो
ही दुनिया का आहे अन 'बेफिकिर' कशाला आहे

गझल: 

प्रतिसाद

कंटाळा यावा इतका उत्साह कुणाला आहे?
कंटाळ्याचाही आता कंटाळा आला आहे

छान.....मतला आवडला

ही लाजत लाजत हसते ती केस विंचरत बघते
प्रत्येक कुटुंबाचा मी अर्धा घरवाला आहे

?....माझ्या डोक्यावरुन गेला.

मृत्यूचा खमंग दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच मसाला आहे

रस्त्यावर अस्तित्वाला मी कडेकडेने नेतो
हा पुढे निघाला आहे तो पुढे निघाला आहे

बघ मदिरा खराब आहे हे सांगण्यास आला हा
ही गोष्ट वेगळी आहे की नशेत आला आहे

हा कविकट्ट्यावर 'गेला' तो कविकट्ट्यावर 'गेला'
गेलोही असतो मीही पण वेळ कुणाला आहे

वरील सगळे शेर मस्तच...

ठरवाच 'सभी' कुलकर्णी की कुठे बघावे आता
इकडे मधुबाला आहे तिकडे मधुशाला आहे

लाचार धोरणे तुमची गोत्यात आणती तुम्हा
माझ्याशी वैर धरे तो मासाच बुडाला आहे

ती चामर वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच कळाला आहे

होकारार्थी हलणार्‍या लोकांच्या माना सार्‍या
एकाला समजत नाही हा काय म्हणाला आहे

वरील शेर अन त्यांना असणारा अर्वाचिन संदर्भ....छानच...

या दोनच प्रश्नांवरती मी जन्म खर्चले लाखो
ही दुनिया का आहे अन 'बेफिकिर' कशाला आहे

व्वा....मक्ता झकास आहे.

डॉ.कैलास

१. गझलेतील विषय/मुद्दे चांगले आहेत. पण एकंदरीतच समाजाभिमुखशी वाटावी अशी गझल असल्याने शेरही बरेच वृत्तांतात्मक झाले आहेत (उदा. २,७,८,९..).
२. काही शेरांत दोन ओळींचा परस्परसंबंध अतिपुसट झाला आहे (उदा. लाचार धोरणे)
३. कुलकर्णी-मधुबाला-मधुशाला वाला शेर तर अतिविशिष्ट आणि १००% प्रासंगिक. अ.भा. मराठी साहित्य संमेलन संपल्यानंतर तर त्या शेराला काही चिरकाल टिकणारा अर्थही उरत नाही. गझलेत शक्यतो असे 'प्रासंगिक', क्षणिक/तात्पुरते संदर्भ, अर्थ नि महत्त्व असलेले शेर टाळले जावेत, असे आपले माझे मत.
४. मतला आवडला. मक्ता आवडला. हृदयाला पाणी सुटणेवाला शेर त्यातल्या त्यात जास्त आवडला (ती कल्पना तर त्याहूनही जास्त आवडली).
५. होकारार्थी हलणार्‍या मानाही आवडल्या. त्या शेरातील दुसरी ओळ 'एकलाही/कोणालाही समजत नाही की दुसरा काय बोलतो आहे' या अर्थाने अपेक्षित असावी, असे दिसते. एकालाही मधल्या ही ला येथे फार महत्त्व आहे. तो 'ही' एकला जोडून घेता आलेला नाही किंवा एकाला समजत नाही दुसरा काय बरळतो आहे, असेही काही योजता आलेले नाही. त्यामुळे शेराच्या अर्थाचा विचार करता एकाला च्या ऐवजी कोणाला असे मला सुचते आहे; समजत ऐवजी उमगत सुचते आहे (कारण समजण्यापेक्षा उमगण्यामध्ये अधिक व्यापक अर्थानुभूतीची, आकलनाची छटा आहे) (कोणाला समजत नाही हा काय म्हणाला आहे किंवा कोणाला उमगत नाही तो काय म्हणाला आहे असे काहीसे).
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

छान गझल .... आवडली..!

बराच विचार करून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार!

या दोनच प्रश्नांवरती मी जन्म खर्चले लाखो
ही दुनिया का आहे अन 'बेफिकिर' कशाला आहे

हा सर्वोत्कृष्ट वाटला!

बाकीही अनेक शेर आवडले, एकंदर गझलेचा मूड छान आलाय.

फार पटली नाही. मक्ता छान.
हाही घ्या...
त्या कविकट्ट्यावर गेला तो कवी खराच असावा
निमंत्रणे नसतानाही जो काव्य म्हणाला आहे